सध्या विशी पंचविशी असणाऱ्यांनापण ‘हमारे जमाने में’ म्हणण्याची वेळ यावी इतकी आता इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे सगळ्यांच्या आयुष्यात बदल घडत आहेत. १९९० च्या दशकात वाढलेल्या पोरांसारखी आताची मंडळी क्रिकेटपण आदी टॅबवर शिकतात. त्यामुळे तिशी न गाठलेल्यांनाही उगाचच जीवन पाहिल्याचा आव आणता येतो.
पण यार वीस वर्षांपूर्वीचा काळच वेगळा होता (पाहिलंत?). गेम म्हणजे मैदानावरचे. मग ते कुठलेही असोत. एका एका गल्लीत क्रिकेटच्या पाच पाच टीम्स असायच्या आणि त्यात कमीतकमी पाचजण अनिल कुंबळेची तर उरलेले नयन मोंगियाची स्टाईल मारायचा प्रयत्न करायचे.
अशा या धमाल काळामध्ये आपल्या गल्लीत साक्षात कुंबळे, द्रवीड किंवा सचिन आपल्याबरोबर खेळायला आला असता तर? शिवाजी पार्कच्या आसपास न राहणाऱ्यांसाठी हे एक मोठं स्वप्न होतं. साक्षात आपला क्रिकेट गाॅड आपल्यात खेळायला आलाय ही बाबच मोठी वाटली असती.
अमेरिकेत दोघा क्रीडाप्रेमींच्या बाबतीतही असंच झालं. हे दोघे टोनिसच शौकीन होते. एका रात्री ते त्यांच्या घराजवळच्या कोर्टवर टेनिस खेळत असताना त्यांच्या कोर्टवर चक्क सेरेना विल्यम्स आली आणि या दोघांची दातखीळ बसली.
जगातली बेस्ट टेनिस प्लेअर असलेली सेरेना विल्यम्स इथवरच थांबली नाही. तर तिने या दोघांना तुमच्यासोबत मी खेळू शकते का असं विचारलं आणि हे दोघे जवळजवळ बेशुध्द पडले.
या मॅचमध्ये जिंकलं कोण हे सांगण्याची गरजच नाहीय पण जिंकण्या-हरण्यापेक्षा टेनिसच्या सम्राज्ञीसोबत खेळायला मिळण्याचा मान मिळाल्याने हे दोघे जाम हरखून गेले होते.
सेरेना विल्यम्स या परिसरात रात्री सहज चालायला बाहेर पडली होती. त्यावेळी तिला हे दोघं खेळताना दिसले. यावेळी यांची काय रिअॅक्शन होते हे पाहत त्यांची गंमत पाहण्यासाठी सेरेनाने मुद्दामहून या दोघांसोबत मॅच खेळली. आणि या सगळ्या गमतीच्ा व्हिडिओसुध्दा सेरेनाने बनवलाय. पाहा एका अमेरिकन पत्रकाराने ट्वीट केलेला हा मजेशीर व्हिडिओ
Serena played tennis in boots with these 2 guys she saw on a court while she was out on a walk last night. IMAGINE. pic.twitter.com/kWXrTE73M9
— Alysha Tsuji (@AlyshaTsuji) February 27, 2017
पण काही असो. आपल्या दैवताला भेटण्याचं प्रत्येक स्पोर्ट्स फॅनचं स्वप्न असतं. सेरेनाने केलेल्या गमतीमुळे का होईना पण तिच्यासोबत खेळण्याचा हा एक अनपेक्षित अनुभव हे दोघे नक्कीच लक्षात ठेवतील