अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशननं TikTok या अॅपला ५.७ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४० कोटींहून अधिकचा दंड ठोठावला आहे. १३ वर्षांखालील मुलांकडून बेकायदेशीररित्या माहिती गोळा केल्याचा आरोप टिक टॉक अॅपवर आहे.

टीक टॉक हे अॅप एका चिनी कंपनीचं आहे . हे अॅप वापरणाऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. भारतातही हे अॅप तरूणांकडून सर्वात जास्त वापरलं जातं. या अॅपवर तेरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची नावं, फोटो, ई-मेल आयडी, लोकेशन आणि फोटो बेकायदेशीररित्या घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

‘टिक टॉक हे व्यासपीठ सर्वांसाठी उपलब्ध आहे. हे अॅप वापरणाऱ्या युवा पिढीबद्दल काळजी वाटते हे आम्ही समजू शकतो. त्यामुळे अमेरिकेतील युवकांसाठी आम्ही मर्यादा घालून दिलेलं विशेष अॅप तयार करणार आहोत. जे सुरक्षा आणि गोपनीयतेचा विचार करूनच तयार केलं जाईल’ असं स्पष्टीकरण टिक टॉक कंपनीनं दिलं आहे.

टिक टॉक हे अॅप आधी Musical.ly म्हणून ओळखले जायचे. अमेरिकेतील १३ वर्षांखालील मुलं हे अॅप सर्वाधिक वापरतात. या अॅपद्वारे ते गोपनीय माहिती देखील शेअर करतात अशी तक्रार पालकांनी केली असल्याचं फेडरल ट्रेड कमिशननं म्हटलं आहे म्हणूनच टिक टॉकवर ही कारवाई करण्यात आल्याचं कमिशननं स्पष्ट केलं आहे.

१६ ते २५ वयोगटातील तरूणांसाठी टिक टॉक हे अॅप तयार करण्यात आलं आहे. मात्र अल्पवयीन मुलंही हे अॅप वापरत असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. या अॅपमुळे मुलं आपली गोपनीय माहिती शेअर करतात या माहितीचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो त्यामुळे कारवाई करणं गरजेचं आहे असं फेडरल ट्रेड कमिशननं सांगितलं आहे. या कारवाईनंतर १३ वर्षांखाली सर्व मुलांचे व्हिडिओ आणि माहिती हटकवण्यात येईल असं टिक टॉकनं म्हटलं आहे.

Story img Loader