Kolkata Doctor Case : कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्येच्या प्रकरणाने देशाला हादरवून टाकलं आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासेदेखील होत आहेत. तर याचप्रकरणा संबंधित लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. या व्हिडीओत मृत्यू अगोदर पीडितेने स्वतःचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पोस्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, असं खरंच घडलं आहे का? नेमका हा व्हिडीओ पीडित महिलेने शूट केला आहे की आणखीन कोणी? याबद्दल आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊ…
सोशल मीडियावर @shyamawadhyada2 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये कोलकाता या ठिकाणी झालेल्या महिला डॉक्टरचा फोटो आणि त्याच्या बाजूला एक व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.
टीप : भारतीय कायदा लैंगिक अत्याचार पीडित व्यक्तीची ओळख उघड करण्यास मनाई करतो.
तपास :
आम्ही व्हिडीओचे कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला आणि नंतर रिव्हर्स इमेज सर्च केले. रिव्हर्स इमेज सर्चमध्ये आम्हाला एक्स युजर मुदस्सीर दासने अपलोड केलेला व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ मूळतः झीनत रहमानने तयार केल्याचे तिने शेअर केले आहे.
हेही वाचा…‘आईनं आरोपीवर कोर्टात झाडल्या गोळ्या’; ‘ही’ घटना खरंच घडली आहे का? जाणून घ्या Video मागचं सत्य…
१७ ऑगस्ट रोजी मुन्नी ठाकूरने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता, ज्यात हा व्हिडीओ झीनत रहमानने शूट केल्याचे कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
त्यानंतर आम्ही झीनत रहमानचे फेसबुकवर खाते तपासून पहिले. आम्हाला तिचे फेसबुक पेज तर सापडलं, पण तिचे प्रोफाइल खाजगी होते.
काही पोस्ट्सच्या माध्यमातून आम्हाला समजले की, तिने यापूर्वीही बलात्काराच्या घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा पोस्ट शेअर केल्या होत्या.
तिच्या या पोस्ट २०२० च्या होत्या. आम्ही तिचे इन्स्टाग्राम प्रोफाइल तपासण्याचाही प्रयत्न केला, पण तो व्हिडीओ तेथून काढून टाकण्यात आला आहे;
त्यानंतर आम्ही तेलुगू टीमशी संपर्क साधला; जे तिच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले होते. टीमशी संवाद साधताना झीनत म्हणाली, “कोलकात्यात जे घडले ते खरोखरच दुःखद आहे. कोलकातातील नव्हे तर कोणत्याही मुलीला, ही बातमी ऐकून धक्का बसेल. मग मी गप्प कसं राहू शकेन? ती कोणाची तरी मुलगी, कोणाची बहीण असू शकते. मी फक्त कल्पना करू शकते की तिच्यासाठी हे किती कठीण असेल. मला त्यांच्या वेदना खोलवर जाणवल्या आणि त्यामुळे मला हा व्हिडीओ बनवायला भाग पाडले”, असे तिने म्हटले आहे.
ती पुढे म्हणाली की, सोशल मीडियावर व्हिडीओमधील मुलगी कोलकाता बलात्कार-हत्येतील पीडित डॉक्टर आहे, अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जातो आहे. काही डिजिटल क्रिएटरनेसुद्धा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दिशाभूल करणाऱ्या शीर्षकांसह व्हिडीओ अपलोड केला आहे. पण, तुम्हीच विचार करा की, अशा परिस्थितीत असा व्हिडीओ कोण बनवू शकेल? स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा व्हिडीओ तयार करण्यावर कोण लक्ष केंद्रित करेल? माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. हा व्हिडीओ अगदी लहान आहे. पीडितांना लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात माझं योगदान आहे ; असं तिने यावर स्पष्ट मत मांडलं आहे.
लाइटहाऊस जर्नलिझमनेदेखील झीनतशी बोलण्यासाठी संपर्क साधला आहे आणि प्रतिसाद मिळाल्यावर ही स्टोरी आणखीन अपडेट केली जाईल.
निष्कर्ष : कोलकाता बलात्कार पीडितेने मृत्यूपूर्वी व्हिडीओ शूट केला असा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ प्रत्यक्षात मेकअप आर्टिस्ट झीनत रहमानने बलात्काराच्या घटनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार केला होता. त्यामुळे तपासातून असं दिसून येत आहे की, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.