Video Shows man Sings sad Song for OLA electric scooter : सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला बरीच मागणी आहे. पण, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली, स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट होऊन अनेक जण जखमी झाले आदी अनेक घटनाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक स्कूटरबाबत ग्राहकांच्या मनात संमिश्र प्रतिक्रिया निर्माण झाल्या आहेत. तर आज अशाच एका ग्राहकाची चर्चा होत आहे, ज्याने राग व्यक्त करण्याची अनोखी कल्पना शोधून काढली आहे. नक्की काय घडलं आहे सविस्तर जाणून घेऊया…
सागर सिंग या व्यक्तीनं ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतली होती. पण, खरेदी केल्यापासून दररोज काही ना काही समस्या येत होत्या. तसेच ओलाने खरेदीनंतर इलेक्ट्रिक स्कूटरसाठी कोणतीही सेवा कंपनीकडून दिली नाही, अशी सागर सिंगची तक्रार आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून की काय, सागरने स्कूटर हातगाडीवर लोड केली. हातगाडीवर स्कूटर ठेवून तो थेट शोरूमसमोर उभा राहिला. माईक हातात घेतला आणि गाणं गाण्यास सुरुवात केली. नक्की व्यक्तीनं कोणतं गाणं गायलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, सागर सिंगने हातगाडीवर इलेक्ट्रिक स्कूटर ठेवून थेट शोरूममध्ये आणली. एवढंच नाही तर व्यक्ती सलमान खानच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील “तडप तडप के इस दिल से आह निकलती राही, मुझको सजा दी ओला ने, ऐसा क्या गुनाह किया, जो लूट गए हा लूट गए, जो लूट गए हम ओला ले के” असं गाणं गाताना दिसला आहे. ग्राहकाच्या विचित्र कृत्याने शोरूमच्या बाहेर गर्दी जमली आणि लोक या मजेशीर घटनेचे साक्षीदार होण्यासाठी घटनास्थळी थांबले.
काही जणांनी थांबून या गोष्टीचा व्हिडीओदेखील (Video) शूट केला. पण, ही घटना नेमकी कुठे घडली याची अद्याप पुष्टी झालेली नाही. हा व्हिडीओ काल सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्याचे दुःख ग्राहकाने वेगळ्याच प्रकारे व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @DhanValue या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये या घटनेची थोडक्यात माहिती दिली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.