Video Shows Mira Road Bus stop Inspired By Mumbai Cha Dabbawala : ठाणे आणि मिरा-भाईंदर महापालिकेने मिरा रोड, काशिमिरा, भाईंदर व ठाणे अशा १०० ठिकाणी या अनोख्या आकाराच्या बसस्थानकांचा मेकओव्हर करण्यासाठी एक योजना आखली आहे. सफरचंद, संत्री यांसारख्या फळांपासून ते अगदी रेडिओपर्यंत, ऑटोरिक्षा, बस, ट्रेन, मेट्रो यांसारखी वाहने पारंपरिकपणे डिझाइन करण्यात आली आहेत. तसेच बसस्थानकसुद्धा विविध आकारांमध्ये बदलले जात आहे. मात्र, मुंबईचे डबेवाले या नावाचे हे बसस्थानक सर्वाधिक लोकप्रिय ठरते आहे.
मिरा रोड येथील दहिसर टोल प्लाझाजवळ बसथांबा एका खास संकल्पनेनं सजवला आहे. मेहनती, ‘मुंबईचे डबेवाले’ या संकल्पनेवर आधारित या बसस्टॉपवर दोन पुरुष पांढरा पोशाख परिधान करून, टोपी घालून, डोक्यावर लाकडी ट्रे आणि त्यावर डब्यांचा भार घेऊन दोन्ही बाजूला उभे आहेत, असं दाखवलं आहे. तसेच या डब्यांच्या सावलीखाली प्रवासी बसची प्रतीक्षा करताना थांबलेले दिसत आहेत. या बसथांब्यावर बसण्यासाठी लाकडी बाकडे आणि छोटे छोटे डबे लावलेले दोन खांबदेखील उभे करण्यात आले आहेत; जे पाहून तुम्ही या कल्पनेचं नक्कीच कौतुक कराल. तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
मुंबईचा डबेवाला :
व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, एक प्रवासी मिरा रोड येथील दहिसर टोल प्लाझाजवळून जात होता. त्यावेळी त्याने हा आकर्षक, सुंदररीत्या बनवलेला बसथांबा पाहिला. बघता क्षणी त्यानं स्वतःच्या फोनमध्ये व्हिडीओ शूट करून घेतला. १९८० पासून हे पाच हजारहून अधिक मेहनती डबेवाले, दोन लाख ऑफिसला जाणाऱ्यांचे घरी बनवलेले जेवण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या या अतुलनीय टीमवर्कने प्रेरित होऊन, त्यांना मान-सन्मान देण्यासाठी हा खास बसथांबा बनवण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @best_buses’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘हे किती क्रिएटिव्ह आहे? @best_bus_mumbai माझ्या घराजवळ या’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा खास बसथांबा बनवण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर महापालिका (MBMC) आणि ठाणे सहकाऱ्यांकडून स्थानिक क्षेत्रविकास (LAD) निधीतून खर्च करण्यात आला आहे; जो सध्या अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.