मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर सातत्याने ऐकायला आणि पहायला मिळणारं गाणं म्हणजे ‘ओ शेठ’. सोशल नेटवर्किंगवरील रिल्स असो, स्टेटस असो किंवा कमेंट बॉक्स असो सगळीकडे सध्या ‘ओ शेठ’चाचा बोलबाला आहे. विशेष म्हणजे सोशल नेटवर्किंगवर या गाण्याचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडला जातोय. पंतप्रधानांनाच डोळ्यासमोर ठेऊन हे गाणं लिहिण्यात आल्याचं बोललं जात असलं तरी यासंदर्भात आता गाण्याच्या निर्मात्यांनीच मोठा खुलासा केलाय.
हे गाणं लिहिणारी संध्या आणि ते संगीतबद्ध करणाऱ्या प्रनिकेतने लोकसत्ता डॉटकॉमला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये या गाण्यासंदर्भात अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. त्यातही महत्वाचा प्रश्न म्हणजे हे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेलं आहे का? लोक या गाण्याला मोदींशी रिलेट करताना दिसत असून यासंदर्भात तुमचं काय मत आहे असा प्रश्न या दोघांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. यावर उत्तर देताना प्रनिकेतने, “आम्हाला अनेकजण हा प्रश्न विचारतात की ओ शेठ गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलं आहे का? तर हा प्रश्न विचारणाऱ्यांना सांगू इच्छितो की, असं काहीही नाहीय आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोळ्यासमोर ठेऊन हे गाणं केलेलं नाहीय. लोकांचं मनोरंजन व्हावं या उद्देशाने हे गाणं आम्ही केलं आहे. ओ शेठ हे शब्द आम्ही लोकांकडूनच घेतलेत. हे गाणं पंतप्रधान मोदींसंदर्भात नसून कोणीही काहीही गैरसमज करुन घेऊ नये. वेगळं काहीही अर्थ यातून काढू नये,” असं चाहत्यांना सांगितलं आहे.
ओ शेठ या शब्दांपासून गाणं बनवण्याची कल्पना ही सोशल नेटवर्किंगवरुनच सुचल्याचं संध्याने सांगितलं. “सोशल नेटवर्किंगवर आपण अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात अनेकजण ओ शेठ, कसंय ना शेठ यासारख्या शब्दांपासून व्हिडीओची सुरुवात करतात. आमच्या क्षेत्रातील गीतकार, संगीतकार नेहमीच काहीतरी ट्रेण्डी देण्याचा प्रयत्न करतात आणि तो आम्हाला सोशल नेटवर्किंगवरुन मिळतो. या शब्दांवरुन गाणं करण्याची संकल्पना प्रिनिकेतची होती. त्याने मला ते गाणं लिहिण्यास सांगितलं. पण ओ शेठच्या पुढे काय लाइन द्यायची हे मला कळत नव्हतं. अखेर आठ दिवसांनंतर त्याने मला पुन्हा विचारलं तेव्हा आम्ही दोघांनी अवघ्या अडीच तासांमध्ये हे गाणं लिहून काढलं आणि नंतर ते पुण्यातील गायक उमेश गवळी यांच्याकडून गाऊन घेतलं,” असं संध्याने सांगितलं. गाण्याची निर्मिती आणि इतरही अनेक प्रश्नांची उत्तर या दोघांनी विशेष मुलाखतीत दिलीय. ही मुलाखत तुम्ही खालील व्हिडीओत पाहू शकता…
२७ जून रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या या गाण्याला ही बातमी लिहिपर्यंत १ कोटी १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.