Maharashtra Day 2023: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. ब्रिटीशांचे भारतावर राज्य असताना त्यांनी आपल्या देशाचे बॉम्बे (मुंबई), बंगाल आणि मद्रास अशा तीन प्रांतांमध्ये विभागणी केली होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. पुढे १९५६ मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार अनेक राज्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. या काळात बॉम्बे प्रांतात आत्ताचे महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचा समावेश होता. तेव्हा मुंबईमध्ये गुजराती आणि मराठी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. मुंबई ही महाराष्ट्रात जाऊ नये असे गुजराती लोकांचे मत होते. त्याविरोधात मुंबई आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली. या चळवळीला पुढे हिंसक वळण आले. १०६ हुतात्म्यांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान केल्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याचा उदय झाला.
२०२० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेचा साठावा वर्धावन दिन साजरा करण्यात आला होता. हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राने ट्विटर अकाऊंटवरुन एक खास व्हिडिओ शेअर केला होता. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्यांची निर्मिती झाली, तेव्हा काय घडलं हे या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. यामध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी केलेली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची घोषणा, महाराष्ट्र राज्याच्या नकाशाची झलक यांसारख्या असंख्य गोष्टींचा समावेश आहे. राज्यनिर्मिती झाल्यानंतर पाच दिवस कशा प्रकारे लोक उत्साह साजरा करत होते हेदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिवनेरी गडावर जाऊन घेतलेले शिवरायांचे दर्शन, सर्व धर्मातील धर्मगुरुंनी मुंबईल क्रॉस मैदानात केलेल्या सामुहिक प्रार्थना, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह निघालेली शोभा यात्रा, हजारों नागरिकांसमोर लता मंगेशकर यांनी केलेले गायन अशा अनेक गोष्टी या मूल्यवान व्हिडीओमध्ये दिसतात. व्हिडीओच्या शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या शपथविधी कार्यक्रमाची झलकदेखील दाखवण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्ससारख्या मुंबईतील महत्त्वपूर्ण इमारतींना केलेली रोषणाईही यात पाहायला मिळते.