शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री उत्तर प्रदेशातील अनेक बस डेपो आणि रेल्वे स्थानकांवर गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. राज्य सरकारची प्रमुख सेवा भरती परीक्षेचे उमेदवार त्यांच्या परीक्षा केंद्रांवरून परतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. यूपी अधीनस्थ सेवा निवड आयोगाची प्राथमिक पात्रता परीक्षा (पीईटी) आहे. यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवार राज्यातील गट क सरकारी नोकऱ्यांसाठी भविष्यातील भरती परीक्षेत बसण्यास पात्र ठरणार आहेत.
या वर्षी आज संपलेल्या दोन दिवसीय परीक्षेसाठी राज्यभरात ३५ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. शनिवारी रात्री दक्षिण उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्थानकावर कॅमेऱ्याने कॅप्चर केलेले दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. लोक ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पत्रकारांनी रेल्वेच्या डब्यातील दृश्येही टिपली, ज्यामध्ये साधं पायही ठेवण्यासाठी जागा दिसत नाही. पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूर रेल्वे स्थानकावरही असेच दृश्य पाहायला मिळाले. तेथे काही उमेदवार चालत्या गाड्यांमध्ये चढताना दिसून येत आहेत.
लखनऊमधील चारबाग रेल्वे स्थानकावर त्यांच्या परीक्षा केंद्रांवरून परत आलेल्या अनेक उमेदवारांनी एका वृत्त वाहिनीला सांगितले की, बस स्टॉप आणि रेल्वे स्थानकांवर गाड्यांच्या गर्दीमुळे त्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यात प्रचंड अडचणीचा सामना करावा लागतोय.
२२ वर्षीय प्रभात वर्माचे परीक्षा केंद्र लखनऊमध्ये होते. तो म्हणाले की, “मी प्रयागराजहून पहाटे १ वाजता ट्रेन पकडली आणि सकाळी ६ वाजता येथे पोहोचलो. तिथे कोणतीही विशेष ट्रेन नव्हती, कोणतीही व्यवस्था नव्हती,” अमेठी ते लखनऊ असा प्रवास करणारे रवी कुमार मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पुरेशी व्यवस्था केलेली नाही. मौर्य यांनी सांगितले की, “आतापर्यंत परीक्षा केंद्रे इतके दूर का दिले? आणि असं असेल तर पुरेशी व्यवस्था का करण्यात आली नाही?”
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
यूपीचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी आज बरेली बस स्टँडवर उमेदवारांशी संवाद साधला. परीक्षा संपल्यानंतर पुरेशा बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अनेक विरोधी नेत्यांनी व्हिडीओ आणि फोटो ट्विट करून उमेदवारांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अराजक स्थितीला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावर सरकारने दावा केला आहे की सोशल मीडियावर प्रसारित केलेले अनेक व्हिडीओ आणि विरोधी नेत्यांच्या ट्विटमधील दृश्य बनावट आहेत. तसंच उमेदवारांसाठी अतिरिक्त गाड्या आणि बसेसची व्यवस्था केली जात असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
उत्तर मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन उमेदवारांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवत आहे. कृपया ट्रेनने प्रवास करताना सुरक्षा नियमांचे पालन करा, असं देखील आवाहन करण्यात येतंय.