Shocking video: हल्ली हृदयविकाराच्या झटक्याद्वारे मृत्यूने झडप घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत; ज्यात अनेकांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गेल्याचे दिसून येते. अलीकडच्या काळात, विशेषत: कोविड-१९ साथीच्या आजारानंतर अनेक प्रकरणे समोर येत असल्याने अचानक हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याची आणखी एक घटना समोर आली असून, एका वृद्ध प्रवाशाला ट्रेनमधून प्रवास करताना हृदयविकाराचा झटका आला. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या टीटीईने त्वरित पुढाकार घेत प्रवाशाला वेळेवर सीपीआर दिल्याने त्याचा जीव वाचला. टीटीई रुग्णाला सीपीआर देत असून, त्याच्या तोंडात हवा फुंकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, वृद्ध व्यक्तीला जीवदान देऊनही लोक टीटीईवर टीका करीत आहेत. पण का? हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच सांगा टीटीईचं काय चुकलं?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना रेल्वे क्रमांक १५७०८ आम्रपाली एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. यावेळी सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर टीटीई ७० वर्षीय प्रवाशाच्या बचावासाठी आला. या प्रवाशाला सीपीआर देण्यात आल्यानं प्रवाशाला नवीन आयुष्य मिळालं. त्यानंतर प्रवाशाला पुढील उपचारासाठी छपरा रेल्वेस्थानकावरील रुग्णालयात पाठवण्यात आलं. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीटीई आपल्या हातांनी रुग्णाची छाती पंप करत आहे आणि रुग्ण त्याच्याकडे पाहत असताना वृद्ध रुग्णाच्या तोंडात हवा फुंकत आहे.

रेल्वे मंत्रालयाने व्हिडीओ शेअर करून म्हटले आहे, “टीटीईच्या तत्परतेने जीव वाचला. ट्रेन क्रमांक १५७०८ ‘आम्रपाली एक्स्प्रेस’च्या जनरल डब्यातून प्रवास करत असताना एका ७० वर्षीय प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. तेथे तैनात असलेल्या टीटीईने तत्काळ मदत केली. सीपीआरने प्रवाशाचा जीव वाचवला. त्यानंतर त्याला छपरा रेल्वेस्थानकावरील रुग्णालयात पाठवण्यात आले.”

दरम्यान, नेटकरी या वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचवल्यानंतरही टीटीईवर टीका करत आहेत. नेटकरी रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत आहेत की, एखादी व्यक्ती शुद्धीवर असल्यास त्याला सीपीआर दिला जात नाही. एका वापरकर्त्यानं सांगितलं, “रुग्ण शुद्धीत आहे आणि त्यानं हात वर केले आहेत; पण टीटीई त्याला सीपीआर देत आहे आणि तोंडानं श्वास घेत आहे. हा कोणत्या प्रकारचा सीपीआर आहे?” दुसऱ्या युजरनं सांगितलं, “व्हिडीओमध्ये असं दिसतं की, त्या व्यक्तीचे हात हलत आहेत म्हणजे त्याच्या हृदयाचे ठोके सुरू आहेत. चुकीचा सीपीआर दिला गेला आहे. लोकांमध्ये अधिक प्रशिक्षण आणि जागरूकता आवश्यक आहे.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मृत्यूच्या तावडीतून तरुणाने आत्महत्या करणाऱ्याला वाचवलं; VIDEO पाहून काळजाचा ठोका चुकेल एवढं नक्की

सीपीआर म्हणजे काय?

हृदयविकाराचा झटका आल्यावर सीपीआर देतात म्हणजे नेमके काय? तर सीपीआरचा अर्थ कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. एखादी व्यक्ती आजारी पडली, तिची शुद्ध हरपली, ती श्वासोच्छवास करीत नाहीये किंवा श्वास मंदावला आहे, अशी कोणतीही स्थिती उदभवल्यास सीपीआर दिला गेला पाहिजे. या उपचार प्रक्रियेद्वारे त्या व्यक्तीच्या फुप्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. छातीवर दाब देत, तोंडाद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video tte saves passengers life by giving timely cpr after he suffered heart attack on moving train netizens react srk