नवी मुंबईतल्या खारघर येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वीस लाखांहून अधिक लोक जमल्याचे सांगण्यात येते. यांपैकी शंभरहून अधिक लोकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यातील ११ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या वरून आज राजकारण पेटलं आहे. मात्र या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांची कर्तव्यदक्षता आणि माणुसकी समोर आली आहे.
पोलिसांकडून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन –
इतक्या उष्ण तापमानात सामान्य अनुयायी रणरणत्या उन्हात डोक्यावर कोणतेही छप्पर नसताना तासनतास बसून राहिले. यावेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रणरणत्या उन्हात तहानलेल्या लोकांना पाणी वाटप केलं. एवढ्या उन्हात पोलिसांनी पाण्याचे बॅलर स्वत: खांद्यावर उचलून नेत लोकांना पाणी वाटप केलं. मानवसेवा हीच इश्वर सेवा म्हणत पोलिसांनी जमलेल्या अनुयायांना मदत केली. पाणी वाटतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू; उष्माघातापासून कसा कराल स्वत:चा बचाव; जाणून घ्या
नेमकी काय घडली घटना?
नवी मुंबईतल्या खारघरमध्ये रविवारी दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र, या कार्यक्रमानंतर उष्माघातानं तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. अजूनही नवी मुंबई आणि आसपासच्या रुग्णालयांमध्ये अनेकजण उपचार घेत आहेत.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते. पण, रविवारी ४२ अंश सेल्सियस तापमान असल्याने पुरस्कार सोहळ्यात आलेल्या अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटी झाली. त्यामुळे अनुयायांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.