Video Viral, elderly man denied entry at mall for wearing dhoti: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये काही मजेशीर तर काही गंभीर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडीओ जनजागृती करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतात.
आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण, ते सहजरीत्या सर्वांपर्यंत पोहोचता यावं यासाठी आता नागरिक सोशल मीडियाचा वापर जास्त करू लागते आहेत. नागरिक आता सुजाण झाले असून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकं सोशल मीडियाची मदत घेऊन व्हिडीओद्वारे त्यांचे चांगले-वाईट अनुभव लोकांपर्यंत शेअर करतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका वयोवृद्ध नागरिकावर अन्याय झाला आहे.
कर्नाटकमधील बंगळूर येथून एक धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. या घटनेत एका वृद्धाला पारंपरिक भारतीय पोशाख असलेले धोतर परिधान केल्यामुळे शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. ही घटना १६ जुलै रोजी जीटी मॉलमध्ये घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच मॉलच्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धाचा सन्मान केला आणि त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफीही मागितली.
व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत, (Video Viral) फकीरप्पा म्हणून ओळखले जाणारे वृद्ध व्यक्ती आणि त्यांचा मुलगा जीटी मॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी म्हणून जाणार होते. पण, प्रवेशद्वारावरच मॉलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांची अडवणूक केली. या बाप-लेकाकडे त्यांची प्री-बुक केलेली चित्रपटाची तिकिटे असूनही त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारला.
या व्हिडीओत आपण पाहू शकता की, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, धोतर नेसून या मॉलमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे आणि अशी मॉलची पॉलिसी आहे. लांबचा प्रवास करून आलेल्या या वृद्ध व्यक्तीने सुरक्षा कर्मचाऱ्याकडे विनंती केली की मला कपडे बदलणं शक्य नाही. परंतु, सुरक्षा कर्मचाऱ्यानंतर मॉलच्या सुपरवायजरने कथित पॉलिसी सांगून, जर प्रवेश हवा असेल तर कपडे बदलून पँट घालून येण्याची मागणी केली.
नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. तसेच भारतीय परंपरा आणि वृद्ध व्यक्तीचा अनादर केल्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि मॉल मॅनेजमेंटचा निषेध केला.
नेटिझन्सनी आपला संताप व्यक्त केला आणि सांस्कृतिक पोशाखांचा अपमान केल्याचा आरोप मॉलवर केला. तसेच पारंपरिक पोशाख आणि सांस्कृतिक मूल्यांचा आदर करण्याचे महत्त्व अधोरेखित करून नेटिझन्सनी त्यांना खडेबोल सुनावले. धोतर हा भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि यात भेदभावाचे कोणतेही कारण नाही, असंही नेटकरी म्हणाले.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मॉल कर्मचाऱ्यांनी मागितली माफी
TV9 कन्नडने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या मॉलच्या कर्मचाऱ्यांनी वृद्ध शेतकरी फकीरप्पा यांचा अपमान केला होता, त्याच कर्मचाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला होता. त्यांना शाल देण्यात आली आणि मॉलचे प्रभारी सुरेश यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तनाबद्दल फकीरप्पा यांची माफी मागितली.