Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात, काही फुकट्या प्रवाशांचा आत्मविश्वास इतका भन्नाट असतो की अनेकदा टीसीने पकडूनही मी कसा तिकीट काढत नाही ही शरमेने सांगायची बाब ते अभिमानाने मिरवतात. यातील काही श्रेष्ठ नट प्रामाणिकपणे काम करणाऱ्या टीसीला अनेकदा रडून, गयावया करून दंड माफ करायला लावतात आणि तिथून पुढे निघताच या महाशयांचा swag भलताच असतो. पण काहीवेळेस यातील कुठलीच क्लुप्ती टीसी समोर चालत नाही. जसं की आपण आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही पाहू शकता. तिकीट तपासणी करणाऱ्या रेल्वेच्या महिला कर्मचारिकेने पुरुषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात प्रवेश घेऊन सगळ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.
मुंबई मॅटर्स या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला तिकीट निरीक्षक फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात चढते. गर्दी पाहता हा साधारणतः संध्याकाळचा वेळ असावा असे वाटत आहे. अपेक्षेप्रमाणे यावेळी अनेकजण खूप गर्दी असल्याने तिकीट न घेताच फर्स्ट क्लासमध्ये चढलेले होते आणि ते नेमके टीसीच्या कचाट्यात सापडले. तिकीट नसलेल्या समज देत असताना काहींनी तर एवढी गर्दी आहे फर्स्ट क्लासमध्ये आल्यासारखं वाटतही नाही मग आम्ही वेगळं तिकीट काढायचं कशासाठी असेही प्रश्न या टीसीला केले पण एक अक्षरही ऐकून न घेता तिकीट नसेल तर दंड भरा असं ठणकावून ही महिला पुढे जाते.
या महिलेची एक वेगळीच शैली नेटकऱ्यांना भावली आहे ती म्हणजे जेव्हा तिने तिकीट तपासले तेव्हा तिथून जाताना प्रत्येकाला गॉड ब्लेस यु असे म्हणत ती पुढे गेली, मुस्लिम प्रवाशाला सलाम वालेकुम तर पंजाबी पागडीतील प्रवाशाला सतश्रीयाकाल म्हणत ही महिला सगळ्यांना शिस्त लावतानाच प्रेमाने व आदराने वागवत आहे.
गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये ती चढली…
आपण बघू शकता एवढ्या गर्दीतही आपले काम चोख करणाऱ्या या महिलेकडे पाहून प्रवासी पुरुषही थक्क होत आहेत, अनेकजण आपापसात कुजबुज करताना दिसत आहेत. या टीसीच्या कर्तव्यदक्षतेचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. अशा फुकट्या प्रवाशांना धडा शिकवल्यासाठी सर्वांनीच या महिला टीसीचे कौतुक केले आहे.