क्रीडा मंत्री विजय गोयल हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकतात. अंध टी-२० क्रिकेट विश्वचषकावेळी विजय गोयल यांनी आपल्या डोळ्यांना पट्टी बांधून उद्घाटन केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. विजय गोयल हे असंवेदनशील असल्याचे ट्विटर युजर्स म्हणत आहेत. रविवारी २९ तारखेला त्यांनी आपल्या डोळ्यांना काळीपट्टी बांधून अंधांच्या विश्वचषकाचे उद्घाटन केले. त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आणि क्रिकेट खेळले.

विजय गोयल हे आधुनिक काळातील गांधारी आहेत असे एका युजरने म्हटले आहे. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता आणि बरखा दत्त यांनी देखील विजय गोयल यांचे कृत्य हे असंवेदनशील असल्याचे म्हटले. विजय गोयल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. या स्पर्धेच्या आयोजकांनी आपणास डोळ्याला पट्टी बांधून खेळण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हे कृत्य केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विश्वचषकाचे समर्थन करण्यासाठी विराट कोहली, गौतम गंभीर, आशिष नेहरा, अजिंक्य राहणे, के. एल. राहुल आणि उमेश यादव यांनी डोळ्याला पट्टी बांधून जाहिरात केली आहे. आम्ही ब्लाइंड सपोर्टर आहोत असा संदेश त्यावर लिहिला आहे. गोयल यांनी हा फोटो शेअर करुन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या या फोटोवर खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

काबिल चित्रपटाचा संदर्भ घेऊनही त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दंगल चित्रपटात काम केलेल्या झायरा वसीमवर ट्विट केले होते. त्यावेळीही वाद ओढावला होता. जर आयोजकांनी विनंती केली असेल तर डोळ्यांना पट्टी बांधून खेळणे हा गुन्हा आहे का असा सवाल विजय गोयल यांनी विचारला आहे.

Story img Loader