माणसं किती निष्ठूर, स्वार्थी आणि असंवेदनशील असतात याचं ताजं उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो. कर्नाटकातील एका गावामधला हा फोटो आहे. अन्नाच्या शोधात हत्तींचा कळप कुरूबाराहुंडी या गावात शिरला होता. हत्तीच्या कळपांना धाक दाखवून त्यांना हुसकावून लावण्यात गावकऱ्यांना यश आलं. भीतीमुळे हत्ती माघारी फिरले. पण, कळपातलं काही महिन्यांचं पिल्लू मात्र मागेच राहिलं.
पिल्लू मागे राहिल्याचं गावकऱ्यांना समजताच कुतूहलापायी गावकऱ्यांनी पिल्लाभोवती गर्दी केली. त्याच्यासोबत गावकरी सेल्फी काढू लागले. त्यामुळे घाबरून हे पिल्लू चित्कारू लागली. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पिल्लाची आई जंगलातून गावात आली होती. पण, माणसांची गर्दी पाहताच ती हतबल होऊन पुढे आलीच नाही. तिची आणि पिल्लाची कायमची ताटातूट झाली. सेल्फीच्या नादात गावकऱ्यांनी या पिल्लाला माघारी पाठवण्याचंही सौजन्य दाखवलं नाही. ही गोष्ट वनधिकाऱ्यांना समजताच ते तातडीनं गावात आले.
पिल्लू जखमी असल्यानं त्याला वैद्यकिय रुग्णालयात नेण्यात आलं. त्याच्यावर उपचारही करण्यात आले पण, आईपासून दूरावलेल्या या पिल्लाचा मात्र २४ तासांत मृत्यू झाला.