व्हिडिओ काॅन्फरन्सिंग ही काही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. ‘स्काईप’, ‘व्हाॅट्सअॅप’, फेसबुकसारख्या मेसेंजर्सवरून आपल्याला ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांच्याशी थेटपणे आणि समोरासमोर चर्चा करायची सोय आता सहजगत्या उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओ काॅलला पूर्वी स्लो-इंटरनेटचा अडथळा यायचा. पण आता हायस्पीड इंटरनेटचा वापर आणि त्याची उपलब्धता वाढल्याने ही सुध्दा बाब मागे पडत चालली आहे.

तंत्रज्ञानाची प्रगती होतच राहील, पुढे आणखीही सोयी येतील, पण काही गोष्टी कधीच बदलणार नाहीत. उदाहरणार्थ लहान मुलांचा निरागसपणा आणि त्यांचा अल्लडपणा.

बीबीसीवर अशाच एका घडलेल्या धमाल प्रसंगाने याकडे सगळ्यांचं पुन्हा लक्ष वेधलं गेलं. एका आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित प्रश्नाबाबत एका तज्ञाला बीबीसी स्टुडिओमधला अँकर प्रश्न विचारत होता. हा तज्ञ त्याच्या घरी होता आणि त्याच्या वेबकॅमवरून बीबीसी स्टुडिओमधल्या अँकरशी बोलत होता. हा तज्ञ आपलं म्हणणं मांडत असताना तो ज्या खोलीत बसला होता त्या खोलीचा दरवाजा खाडकन उघडून त्याची एक लहान मुलगी त्या खोलीत आली आणि आपल्या बाबांच्या मागे बसून काहीतरी खायला लागली. बीबीसीच्या अँकरला याची गंमत वाटून त्याने तुमची मुलगी तुमच्या खोलीत आली आहे असं त्याने सांगितल. इथवर मामला ठीक होता पण पुढे त्या खोलीत आपला वाॅकर घेऊन त्याचं लहान बाळसुध्दा आलं आणि प्रचंड गोंधळ माजण्याची शक्यता निर्माण झाली.

पण या दोघांवर नजर ठेवण्याची जबाबदारी ज्या ताईकडे दिली होती ती धडपडत या दोघांच्या मागे आली आणि तिने या दोघांना खेचून खोलीच्या बाहेर नेलं. पण जाता जाता जी काही थोडी आदळआपट व्हायची होती ती झालीच! पाहा हा व्हिडिओ

 

 

 

टेलिव्हिजन पत्रकारितेत असे अनेक गमतीशीर प्रसंग येतात. पण प्रत्येकवेळी परीटघडी घालून वातावरणावर ताबा मिळवणं शक्य नसतं. बीबीसीचा हा अँकर आणि हा तज्ञ या दोघांनीही हा प्रसंग आपलं हसू दाबत शांतपणे हँडल केला. पण नेटिझन्सना पाहायला आणखी एक व्हायरल व्हिडिओ मिळाला!

Story img Loader