लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे संपन्न झाले. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुढचे १०० दिवस नव्या उत्साहात, जल्लोषात काम करण्याचे आवाहन केले. पुढचे १०० दिवस आपल्या प्रत्येकाला झोकून देऊन काम करायचे आहे, नव्या मतदारांपर्यंत पोहोचायचे आहे, असे लक्ष्य मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिले. या भाषणातील मोदींच्या भाषणातील महत्त्वाच्या मुद्द्या्ंच्या व्हिडिओ क्लिप भाजपाने सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत. पण याच कार्यक्रमातील एक मजेशीर व्हिडिओ क्लिपही सध्या व्हायरल होत आहे. ज्यावर काही वेळातच मिम्सचा पाऊस पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या क्लिपमध्ये?

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराची उभारणी केल्याबद्दल भाजपाच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एक मोठा हार कार्यकर्त्यांनी मंचावर आणला. मोदी यांच्या बाजूला उपस्थित असलेले भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील मोदींसह हारात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण काही सेकंदाच्या आत सर्वांची एकमेकांशी नजरानजर झाली आणि तीनही नेत्यांनी हारात खुपसलेले आपले शीर बाहेर काढले.

“भाजपाला तिसऱ्यांदा सत्तेत यायचं आहे कारण…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपाच्या अधिवेशनात वक्तव्य

भाजपा मुंबईच्या एक्स हँडलनेही हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. काही सेकंदातच ही घडामोड घडते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपस्थितांना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. काही सेकंद पंतप्रधान मोदींच्या गळ्यात हार ठेवल्यानंतर तो बाजूला केला गेला. यावेळी उर्वरीत तीनही नेते एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत.

ही व्हिडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर एक्स आणि इतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे. ॲमेझॉन प्राइमवरील लोकप्रिय पंचायत वेबसीरीजमधील ‘गजब बेज्जती है यार’ हे वाक्य उचलून या छोट्याशा घटनेला गमतीचे स्वरुप दिले जात आहे.

“नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील आणि घराणेशाही मूळापासून संपवतील”, अमित शाह यांचा दावा

महेश पटीदार नावाच्या एक्सवरील एका युजरने अमित शहा यांच्याकडे लक्ष वेधण्यास सांगितले. त्यांना या हारात यायचे होते. पण कुणीतरी त्यांना खुणवले आणि ते मागे हटले, असा अंदाज पटीदारने काढला आहे.

रमन मोर्य नावाच्या एका युजरने राजनाथ सिंह यांच्याकडे पाहण्यास सांगितले. ते जवळजवळ हाराच्या आतमध्ये घुसलेच होते. मात्र इतर नेते हारात नसल्याचे पाहून ते बाहेर पडले. राजनाथ सिंह यांच्या चेहऱ्यावरचे भाव यावेळी पाहण्यासारखे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणातून कार्यकर्त्यांचे स्फुरण वाढविले. “मागच्या १० वर्षांत भाजपाच्या योजनांचा लाभ कोट्यवधी लोकांना मिळाला आहे. त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचा आणि माझा नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी नमो ॲपची मदत घ्या, या ॲपच्या माध्यमातून माझा नमस्कार आणि माझे पत्र त्यांना द्या. प्रत्येक बुथमधील असा एकही नवमतदार सोडू नका, ज्यापर्यंत भाजपाचा कार्यकर्ता पोहोचला नाही”, असे आवाहन मोदी यांनी केले.