जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अवघड परीक्षा, मुलाखतींना सामोरे जावे लागते. मुलाखतींच्या अनेक फेऱ्या पास झाल्यानंतर निवड होते. या मुलाखतीत यशस्वी झाल्याचा आनंद कर्मचाऱ्याला असतो पण त्याआधी मनात खूप भीती, दडपण असते. पण चांगली तयारी केली तर तुम्ही त्या मुलाखतीत सहज यशस्वी होऊ शकता. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की, एखाद घरं भाड्याने घेण्यासाठीही मुलाखत द्यावी लागते? नाही ना… पण खर आहे, जगप्रसिद्ध गुगल कंपनीत मुलाखत यशस्वी झालेल्या व्यक्तीला बेंगळुरुमध्ये घरं भाड्याने घेण्यासाठी एक मुलाखत द्यावी लागली. ही मुलाखत त्याला गुगलमधील मुलाखतीपेक्षाही अवघड वाटली ज्यात तो नापास झाला. ही गोष्ट तुम्हाला थोडी विचित्र वाटेल पण खरी आहे.
अलीकडेच रिपू दमन भदोरिया या व्यक्तीने लिंक्डइन या सोशल मीडिया साइटवर आपला एक अनुभव शेअर केला आहे. रिपू भदोरिया या व्यक्तीने गुगल कंपनीत मुलाखत सहज यशस्वीरित्या पार केली, पण जेव्हा तो नोकरीनिमित्त बेंगळुरुला शिफ्ट होण्यासाठी आला, तेव्हा भाड्याचं घर देणाऱ्या एका घर मालकाने त्याची मुलाखत घेतली, त्याने मुलाखत तरी दिली पण त्यात तो अयशस्वी ठरला, ज्यामुळे रिपूला भाड्याने घरं मिळू शकले नाही, रिपूचा हा अनुभव वाचून युजर्सही खूप आश्चर्यचकित झाले आहेत.
बेंगळुरु हे भारतातील एक मोठे आयटी हब बनले आहे. ज्यामुळे बेंगळुरुमध्ये कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या लोकांना याठिकाणी आल्यानंतर घरं शोधण्यातही खूप अडचणी येतात. असाच अनुभव रिपू भदोरिया देखील आला. जो अनुभव त्याने लिंक्डइनवर शेअर केला आहे.
रिपू भदोरियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मला दु:खही होत आहे आणि आनंदही… दुःख या गोष्टीचं आहे की, आयुष्यात मी अशा एका मुलाखतीत अयशस्वी झालो, ज्या मुलाखतीसमोर गुगल मुलाखतही सोप्पी होती. त्याने पुढे लिहिले की, गेल्या वर्षी २०२२ नंतर मी बंगळुरूला शिफ्ट झालो. पण कोविडनंतर लगेच घर मिळणं खूप अवघड होतं पण तरीही खूप अडचणींनंतर मला घर मिळालं पण तिथे राहण्यासाठी मला मुलाखत द्यावी लागली. यामागचे कारण म्हणजे, तेथील चांगल्या घरांना मोठी मागणी आहे. ज्यामुळे बेंगळुरुमध्ये अनेक घरमालकांनी भाडेकरूंच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. मी देखील मुलाखत दिली पण मी त्यात अयशस्वी झालो आहे.
यावेळी रिपूने घरमालकाला विचारले की, मी नापास का झालो यामागचे कारण मला समजेल का? ज्यावर घरमालकाने सांगितले की, तुम्ही गुगलमध्ये काम करता त्यामुळे तुम्ही भाड्याने घरं घेण्यापेक्षा स्वत:चं घर विकत घ्याल. पण मी आनंदी आहे कारण मी पुढील मुलाखत यशस्वी झालो. जर कोणाला माझ्याकडून काही टिप्स हव्या असतील तर त्या मी सहज देऊ शकतो. रिपू भदोरियाच्या या पोस्टवर आता अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.