Devendra Fadnavis Eknath Shinde Babri demolition Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. या फोटोत बाबरी मशीद विध्वंसाच्या दिवशी महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारसेवक म्हणून सहभागी होते असा दावा करण्यात आला आहे. या फोटोत देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला दिसणारी व्यक्ती एकनाथ शिंदे आहेत, असा दावा करण्यात आला आहे. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा फोटो खरा आहे, पण त्यातून एक मोठं सत्य लपवण्यात आलं आहे, त्यामुळे हे सत्यच आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न केला.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजरने हिंदुत्व नाईट या दाव्यासह फोटो शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह फोटो शेअर करत आहेत.
तपास:
इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही तपास सुरू केला.
आम्हाला महाराष्ट्र टाइम्स या मराठी न्यूज वेबसाइटवर या फोटोसह एक बातमीदेखील आढळून आली.
त्या बातमीत बाबरी मशीद विध्वंसावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत असल्याचे सांगितले आहे, तसेच त्यावेळी तेथे शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
या बातमीसाठी फोटो तर वापरण्यात आला आहे, पण त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये कुठेही त्यावेळी फडणवीस यांच्याबरोबर एकनाथ शिंदे होते असे नमूद केलेले नाही.
तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मीडिया कोऑर्डिनेटर विराज मुळे यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आम्हाला माहिती दिली की, फोटोतील व्यक्ती एकनाथ शिंदे नाही आणि व्हायरल दावा खोटा आहे.
यानंतर तपासाच्या आणखी पुढच्या टप्प्यात आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर कार्यालयात संपर्क केला. यावेळी त्यांच्या सेक्रेटरीने आम्हाला माहिती दिली की, फोटोत दिसणारी व्यक्ती भोजराज डुंबे हे आहेत, डुंबे हे नागपुरातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.
पुढे आम्ही भोजराज डुंबे यांच्याशीही संपर्क साधला. ते म्हणाले की, फोटोतील व्यक्ती ही मीच आहे आणि माझ्याबरोबर देवेंद्र फडणवीस आहेत. २००२ मधील हा फोटो आहे, यावेळी मी भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM), नागपूर अध्यक्ष होतो, तर फडणवीस बीजेवायएम प्रदेश महामंत्री होते. त्यावेळी आम्ही लोडशेडिंगच्या विरोधात आंदोलन करत होतो. राज्यातील हजारहून अधिक तरुण कार्यकर्ते त्या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनावेळी आम्ही राज्य विद्युत कार्यालयाचा घेराव घातला, तेव्हा नागपूरचा गड्डीगोदाम परिसरात हा फोटो काढण्यात आला होता.
निष्कर्ष :
व्हायरल फोटो बाबरी मशीद विध्वंसादिवशीचा नाही, तसेच माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिसणारी व्यक्ती महाराष्ट्राचे काळजीवाहू एकनाथ शिंदे नाहीत. हा फोटो २००२ मधील लोडशेडिंगच्या विरोधातील आंदोलनादरम्यानचा असून फडवणीस यांच्याबरोबर दिसणारी ती व्यक्ती नागपूरमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते भोजराज डुंबे आहेत, त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.