Woman Matrimonial Ad Viral Post : लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणे हे युद्ध जिंकण्यापेक्षा कमी नाही. पूर्वी कुटुंबातील वडीलधारी मंडळी स्थळं बघायचे. पण आता मॅट्रिमोनी साइट्स आहेत, तिथे आपल्याला हवा तसा जोडीदार शोधण्याची संधी मिळते. त्यामुळे हल्ली लोक या वेबसाइट्सद्वारे त्यांचा आदर्श जीवनसाथी शोधताना दिसत. त्याशिवाय वर्तमानपत्रातही लग्नासाठी वधू पाहिजे, वर पाहिजे अशा जाहिराती दिल्या जातात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जाहिरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका ३० वर्षीय तरुणीने जोडीदारासाठी अनेक विचित्र अटी ठेवल्या आहेत. पण, या जाहिरातीमुळे आता सोशल मीडियावर विविध चर्चा रंगत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या जाहिरातीमध्ये एका तरुणीने जोडीदारासाठी काही विचित्र अटी ठेवल्या आहेत. जाहिरातीनुसार, ३० वर्षांची ही तरुणी २५ ते २८ वयोगटातील अविवाहित जोडीदाराच्या शोधात आहे. या जोडीदाराकडे एक बंगला किंवा २० एकरांचे फार्महाऊस असावे. या जाहिरातीत तरुणी सुशिक्षित आणि फेमिनिस्ट असल्याचे म्हटले आहे, तसेच तिचे केस शॉर्ट आहेत. ही तरुणी भांडवलशाहीच्या विरोधात काम करते.
तरुणीने लग्नासाठी जोडीदार हवा यासाठी वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीचा फोटो ऋषी नावाच्या एका एक्स युजरने पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये युजरने लिहिले, “भांडवलशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या ३० वर्षीय फेमिनिस्ट महिलेला २५ वर्षांचा श्रीमंत मुलगा लग्नासाठी हवा आहे, जो चांगला व्यवसायिक असावा, कोणाला माहीत असल्यास कृपया मला कळवा.”
जोडीदारासाठी विचित्र अटी असलेल्या विवाहविषयक जाहिरातीशी संबंधित पोस्टवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “केवळ एक पागल व्यक्तीच तिच्याशी लग्न करेल.” आणखी एका युजरने लिहिले, “मला समजत नाही की या फेमिनिस्ट महिलांना लग्नाची गरज का आहे.”