तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्हाला शिबा इनू जातीचा चीम्स कुत्रा नक्कीच माहिती असेल यात शंका नाही. हो कारण अनेक व्हायरल मिम्समध्ये या कुत्र्याला तुम्ही पाहिलं असेल. शिवाय तो अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणायला कारणीभूत होता. मात्र, आता हा चीम्स या जगात राहिला नाही. कारण त्याचे शुक्रवारी निधन झाले. चीम्स मागील काही महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत होता, याच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मीम्समध्ये, चीम्स, ज्याला बाल्ट्झ किंवा बॉल बॉल देखील म्हटलं जायचं, तसेच त्याला ‘चिम्सबर्गर’ म्हणूनही ओळखले जायचे. तर या चीम्सच्या मृत्यूची बातमी त्याच्या मालकाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दिली आहे. त्याने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, “दुःखी होऊ नका, मीम्सचा भाग बनून बाल्ट्झने जगाला दिलेला आनंद लक्षात ठेवा. तुम्हाला आणि मला गुदगुल्या करणारा गोल हसरा चेहरा असलेल्या शिबा इनूने कोविड महामारीच्या काळात अनेकांना मदत केली आहे आणि तुमच्यापैकी अनेकांना खूप आनंद दिला आहे, पण आता त्याचे ध्येय पूर्ण झाले आहे.”
चीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक मीम्समध्ये दिसायचा. त्याचा एक मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग देखील होता. चीम्सचा शुक्रवारी शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला. तर चीम्सच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेकजण त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
म्हणून चीम्स नाव पडले –
चीम्सचा आवडता पदार्थ चीझबर्गर होता, म्हणून त्याला चीम्स हे नाव पडले. चीम्स २०१० मध्ये एक फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यानंतर लोकांनी ते मीम्समध्ये वापरण्यास सुरुवात केली, जे नेटकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवडले होते. त्यानंतर तो जगभरात फेमस झाला होता.