उन्हाची तीव्रता दिवसागणिक आणखी वाढू लागली. डोंगर उघडेबोडके दिसू लागले आहेत. नदी, तलाव, पाणवठे आटले आहेत. त्यामुळे प्राणी-पक्षी पाण्यावाचून व्याकूल होत आहेत. शहरांमध्ये तर ठिकठिकाणी वृक्षतोड झाल्याने पक्ष्यांचा निवारा हिरावून घेतला आहे. मग हे पक्षी जाणार कुठे? असा प्रश्न पडतो. पण राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात पक्षांसाठी इमारत बांधण्यात आली आहे, ज्याप्रमाणे माणसांसाठी इमारती बांधल्या जातात, अगदी तशीच. पक्ष्यांना राहण्यासाठी ११ मजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत पक्ष्यांना निवारासोबत अंघोळीसाठी स्विमिंग पूलदेखील बांधण्यात आलं आहे.
या इमारतीत पक्षी आपली घरटी बांधू शकतात. सुमारे ११०० पक्षी राहू शकतात. तसेच आतमध्ये खाण्यापिण्याची सोय केली आहे. राजस्थानमधील बिकानेरमधील श्रीडुंगरगडच्या टोलियासर गावात हे विशेष इमारत तयार करण्यात आली आहे. ही इमारत तयार करण्यासाठी सुमारे ५ लाख रुपये खर्च आला आहे. इमारत घुमटाच्या आकारात तयार केली आहे. जेणेकरून पक्षी कोणत्याही बाजून येऊन त्यामध्ये राहू शकतात. आतापासून पक्षांनी आपलं बस्तान मांडलं आहे.
सोशल मीडियावर या इमारतीचा फोटो व्हायरल होत असून फोटोखाली लोकं आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करून कामाचं कौतुक करत आहेत.