रानडुक्कर आणि माकडांच्या उच्छादामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. रानडुक्कर आणि माकडं शेतातील मका, ऊस, ज्वारी, कांदा, भुईमूग यासारखी पिकं नष्ट करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. कसेबसे कर्ज काढून पिकवलेली पिकं जमीनदोस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत. कितीही गुंफणगुंडी करा, बुजगावणे लावा, तरी उच्छाद काही कमी होत नाही. यावर आता एका शेतकऱ्याने युक्ती लढवत माकडांचा उच्छाद कायमचा बंद केला आहे. माकडं आणि डुक्कर या युक्तीमुळे शेतात घुसत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
तेलंगणातील भास्कर रेड्डी या शेतकऱ्याने आपल्या पिकाचे रक्षण करण्यासाठी अस्वलाचा पोशाख घालून शेतात फिरण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतात घुसखोरी करणाऱ्या रानडुक्करं आणि माकडं यांच्यात दहशत निर्माण झाली आहे. शेतातील पीक वाचवण्यासाठी ते आणि त्यांचा मुलगा आलटून पालटून कपडे घालून शेतात जात होते. जेणेकरून रानडुक्कर आणि माकडांना शेतापासून दूर ठेवता येईल. सध्या त्यांनी या कामासाठी ५०० रुपये प्रतिदिन या दराने एक व्यक्ती नेमली आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने हा ड्रेस हैदराबादमधील एका पोशाख पुरवठा विक्रेत्याकडून विकत घेतला होता. १० हजार रुपयांना हा ड्रेस विकत घेतला आहे, असं शेतकऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.
सध्या मानवी अस्वल सर्वत्र चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या कल्पनेचं कौतुक केलं आहे.