केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये ‘महिला’ या शब्दाबाबत एक नवीन अपडेट करण्यात आले आहे. या अपडेटमध्ये ‘महिला’ या शब्दाच्या व्याख्येत बदल करण्यात आला आहे. नव्या व्याख्येनुसार ‘अशी कोणतीही व्यक्ती जी स्वतःची ओळख स्त्री म्हणून करते, त्या व्यक्तीला महिला असे संबोधता येईल. त्या व्यक्तीचे लिंग जन्माच्या वेळी कोणते होते याची दखल यात घेतली जाणार नाही.’
टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार ‘महिला’ शब्दाची अतिरिक्त व्याख्या ऑनलाईन डिक्शनरीमध्ये जोडण्यात आली आहे. ज्यामध्ये तृतीयपंथींचा समावेश करण्यात आला आहे. ‘महिला’ या शब्दासाठी ‘मनुष्य प्रजातीतील प्रौढ स्त्री’ यासह ‘इतर लिंगामध्ये जन्म झाला असला तरी एखादी प्रौढ व्यक्ती स्वतःची ओळख स्त्री म्हणून करत असेल आणि त्याप्रमाणे जीवन जगत असेल तर ती व्यक्ती महिला आहे’ ही व्याख्या जोडण्यात आली आहे.
आणखी वाचा: नवरीने थेट पोलिसांकडे मेकअप आर्टिस्टविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या नेमकं काय घडलं
या व्याख्येची उदाहरणं देखील देण्यात आली आहेत. ‘ती नॅशनल ऑफिससाठी निवड झालेली पहिली तृतीयपंथी महिला होती’, ‘मेरी ही एक महिला आहे जिचे जन्मावेळी लिंग पुरुषाचे होते’, या व्याख्या देण्यात आल्या आहेत.
यासह केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये ‘पुरुष’ शब्दाची व्याख्याही बदलण्यात आली आहे. ‘मनुष्य प्रजातीतील प्रौढ पुरुष’ यासह ‘इतर लिंगामध्ये जन्म झाला असला तरी एखादी प्रौढ व्यक्ती स्वतःची ओळख पुरुष म्हणून करत असेल आणि त्याप्रमाणे जीवन जगत असेल तर ती व्यक्ती पुरुष आहे’ ही व्याख्या जोडण्यात आली आहे.