लॉटरी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी आपल्याला लॉटरी लागावी अशी अपेक्षा असते. यासाठी काहीजण अनेक वर्षांपर्यंत प्रयत्न करत राहतात. कधीकधी ‘सबर का फल मिठा होता है याचा प्रत्येय त्यांना येतो आणि काही भाग्यवान काही मिनीटांमध्ये करोडपती होतात. अशीच एक घटना चीनमध्ये घडली, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार चीनमधील एका व्यक्तीला तब्बल २४८ कोटींची लॉटरी लागली आहे. पण या व्यक्तीने त्याच्या कुटुंबापासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे. पत्नीला आणि मुलाला ही लॉटरी लागल्याची गोष्ट समजली तर ते याबाबत गर्विष्ठ होतील आणि पैसे कमावण्यासाठी मेहनत न करता आळशी होतील असे या व्यक्तीचे मत आहे.
आणखी वाचा : Anxiety वर रशियन कंपनीने काढला अजब उपाय; जिवंतपणी रुग्णाला पुरले जाणार…; थेरेपीची किंमत तब्बल ४७ लाख
चीनमधील कायद्यानुसार या व्यक्तीला जिंकलेल्या पैशातील ४३ मिलिअन युआन इतक्या रक्कमेचा कर भरावा लागेल. तसेच ५ मिलिअन युआन चॅरिटीला दिल्यानंतर या व्यक्तीला १७१ मिलिअन युआन इतकी रक्कम मिळेल. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने ४० लॉटरीची तिकीट ८० युआनसाठी विकत घेतली, ज्यामधील ७ नंबर हे एकसारखे होते. या लॉटरीची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, या व्यक्तीने चांगल्या कारणासाठी ही गोष्ट कुटुंबाकडुन लपवून ठेवली असल्याने अनेकांनी या गोष्टीचे कौतुक केले.