मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर एक गाणं तुफान व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील किंवा अल्बममधील गाणं नसून एका लहान मुलाने गायलेलं गाणं असून गाण्याचं नाव आहे, बचपन का प्यार. छत्तीसगडमधील सुकमा येथील सहदेव नावाचा मुलगा या व्हायरल गाण्यामुळे रातोरात स्टार झालाय. इंटरनेटवर सहदेवच्या या गाण्याने धुमाकूळ घातलाय. या गाण्यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते बॉलिवूडमधील गायकांपर्यंत अनेकांनी सहदेवचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र आता एमजी या ब्रिटीश कार निर्माता कंपनीनच्या एका शोरुमने या गाण्यासाठी सहदेवला २१ हजारांचा एक विशेष धनादेश दिलाय. एमजीने सहदेवचं त्याच्या गाण्याच्या कौशल्यासाठी विशेष कौतुक करत हे बक्षिस दिलं आहे. मात्र सोशल नेटवर्किंगवर सहदेवला एमजीने २३ लाखांची गाडी भेट म्हणून दिल्याचं व्हायरल होत आहे. सहदेवला भेट म्हणून कार देण्यात आल्याचं सांगत काही फोटो व्हायरल झाले आहेत. खरोखरच एमजीने सहदेवला २३ लाखांची गाडी भेट दिलीय का यासंदर्भातील चर्चांना उधाण आलेलं असतानाच याबद्दलचा मोठा खुलासा कंपनीने केला आहे.

नक्की वाचा >> मका आणि सोयाबीनच्या मोबदल्यात टोयोटा फॉर्च्यूनर; कंपनीची शेतकऱ्यांसाठी विशेष ऑफर

सहदेव रातोरात स्टार झाल्यानंतर बॉलिवूडमधील गायक बादशाहने सहदेवसोबत व्हिडीओ कॉलवरुन चर्चा केली होती. त्याने सहदेवला चंढीगडला भेटीसाठी येण्याचं आमंत्रणही दिलं होतं. बादशाह सहदेवसोबत लवकरच एक गाणं रेकॉर्ड करणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहे.

मुख्यमंत्रीही झाले फॅन

केवळ बॉलिवूडच नाही तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना सुद्धा सहदेवचं हे गाणं आवडलं आहे. मागील मंगळवारी भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी सहदेवकडून हे गाणं ऐकलं. भूपेश बघेल यांनी स्वत: हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला होता. बचपन का प्यार… वाह!, अशा कॅप्शन सहीत बघेल यांनी हा व्हिडीओ पोस्ट केलेला.

सहदेवचा तो व्हिडीओ व्हायरल

सहदेवचे वडील हे शेतकरी आहेत. त्यांच्या घरी मोबाइल, टीव्ही यासारख्या गोष्टी नाहीयत. दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर हे गाणं ऐकून सहदेवने ते आपल्या शाळेत गायलं होतं. आज तेच गाणं व्हायरल झालं असून त्यामधून सहदेवला फार प्रसिद्धी मिळाली आहे. सहदेवने एका मुलाखतीमध्ये मोठं झाल्यावर आपल्याला गायक व्हायचं आहे, असं सांगितलं आहे. मात्र याच प्रसिद्धीसोबत सहदेवबद्दल बरीच नवीन माहिती समोर येत आहे. आता त्याला एमजी कंपनीने गाडी भेट दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये सहदेवच्या हातात एक महिला मोठ्या आकाराची प्रतिनिधिक स्वरुपाची चावी देत असताना दिसत आहे. या व्हिडीओवर आता कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

नक्की वाचा >> बर्थडे पार्टी कुत्र्याच्या वाढदिवसाची… मालकाने खर्च केले तब्बल तीन लाख रुपये

कंपनीचं म्हणणं काय?

सहदेवला एमजी कंपनीकडून गाडी भेट देण्यात आल्याचं वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. टीव्ही ९ भारतवर्षने एमजी कंपनीच्या प्रवक्त्यांकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून कंपनीने सहदेवला गाडी भेट दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कंपनीने हे वृत्त फेटाळून लावला आहे. आम्ही सहदेवला कोणतीही गाडी भेट दिलेली नाही. आम्ही त्याला एक २१ हजारांचा धनादेश देऊन त्याचा सत्कार केल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हा धनादेश देताना बाजूला उभ्या असणाऱ्या महिलेने गाडी विकत घेतल्यानंतर देतात त्याप्रमाणे मोठ्या आकाराची पुठ्याची चावी हातात धरल्याने सहदेवला गाडी भेट दिल्याचा दावा केला जातोय. मात्र हा दावा चुकीचा असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सोशल नेटवर्किंगवर एक छोटी क्लिप चुकीच्या माहितीसहीत व्हायरल करण्यात आली असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे.