तुमच्या घराचा ताबा सापांनी घेतला आहे हे कळल्यावर तुम्ही काय कराल?, त्यांना काढण्यासाठी तुम्ही साप पकडणाऱ्याला बोलवून घ्याल. पण एका अमेरिकन व्यक्तीने हे प्रकरण आपल्या हातात घेण्याचं ठरवले आणि एक अत्यंत टोकाचे पाऊल उचललं. त्यामुळे सापांना पळवताना अख्खं घर गमवण्याची वेळ आली. सापांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना घर जाळून टाकले. अमेरिकेतील मॉन्टगोमेरी काउंटी, मेरीलँडमधील ही घटना आहे. घराला आग लागताच घर मालकाने अग्निशामक दलाला कळवलं. तेव्हा मालकाने सापांपासून सुटका करण्याचा प्रयत्न करताना आग लागल्याचं समोर आलं.

घरातून सापांना बाहेर काढण्यासाठी मालकाने धूर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु निखारे ज्वलनशील पदार्थांच्या अगदी जवळ ठेवलेले होते. त्यामुळे घराला आग लागली. माँटगोमेरी काउंटी फायर डिपार्टमेंटने घराच्या जळालेल्या, पोकळ अवशेषांसह घराचे फोटो शेअर केले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तथापि, मालमत्तेचे एकूण नुकसान १ दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालं आहे.

अग्निशमन विभागाचे प्रवक्ते पीट पिरिंगर यांनी ट्विट केले आहे की, “बिग वुड्स आरडी, घराला आग लागली. सापाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी धूर केला होता. मात्र ज्वलनशील पदार्थ जवळ असल्याने आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.” सापांबाबत अजूनही निश्चित असं कळू शकलेलं नाही.