‘तेलही गेले, तूपही गेले, हाती राहिले धुपाटणे’ अशी आपल्याकडे म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय एका घटनेतून आला आहे. एका व्यक्तीला तब्बल एक कोटी रुपयांची लॉटरी लागली. पण नवऱ्याने लॉटरीत जिंकलेले पैसे घेऊन त्याची बायको प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, थायलंडमधील मानित नावाच्या व्यक्तीने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्याने या लॉटरीत तब्बल एक कोटी रुपये जिंकले. एवढ्या मोठ्या रक्कमेची लॉटरी लागल्यामुळे तो खूप आनंदी झाला. शिवाय आता इथून पुढे सुखाने संसार करायची स्वप्न देखील तो पाहायला लागला.
आणखी वाचा- Promoted to Dad! मुलीबरोबर राहता यावं म्हणून पित्याने सोडली मोठ्या पगाराची नोकरी
आपल्याला लॉटरी लागल्याची माहिती त्याने पत्नीला सांगितली, “आपल्या आयुष्यातील कष्टाचे दिवस संपले असून, आता सुखासमाधानात संसार करायचा” असं त्यांने बायकोला सांगितलं. पण त्याच्या या सुखाच्या संसाराला बायकोने सुरुंग लावला. कारण, नवऱ्याने घरी आणलेले लॉटरीचे पैसे घेऊन पत्नी प्रियकरासोबत पळून गेली. त्यामुळे लॉटरी लागली पण काही क्षणातच बायको आणि पैसे दोन्ही गेल्याने मानितवर दु:खाचा डोंगर कोसळला.
आणखी वाचा- ऑटो चालकाने महिलेला परत केले हरवलेले एअरपॉड्स, अत्यंत हुशारीने तिला शोधले, महिलेसह नेटकरी झाले चकित
धक्कादायक बाब म्हणजे हालाखीच्या परिस्थितीत २६ वर्ष एकत्र संसार करणाऱ्या बायकोने, पैशाच्या मोहापायी आपल्या तीन मुलांना नवऱ्याजवळ सोडून ती प्रियकरासोबत पळाली. दरम्यान, या घटनेनंतर पती मनितने पोलीस स्टेशनमध्ये बायको विरोधात तक्रार दाखल केली असून फरार महिला व तिच्या प्रियकराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.