Viral Photo Shows Pune Flour Mill Owner Story : आपल्या आजूबाजूच्या परिसरात एखादी तरी पीठ गिरणी कामगाराचे दुकान असतेच. रोज ताटात येणारी पोळी आणि भाकरीसाठी याच गिरणीतून पीठ दळून आणावे लागते. अगदी सकाळी १० ते ११ वाजता सुरु होणारी ही गिरणी अगदी रात्री ११ ते १२ पर्यंत सुरूच असते. तसेच दिसायला छोटेसे असले तरीही हे दुकान सुरु करण्यासाठी इतर व्यवसायाइतकीच त्यांनाही मेहनत करावी लागते हेच सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. एक्स (ट्विटर) युजर नेतीन एस धर्मावतने पीठ गिरणीच्या भिंतीचा एक फोटो शेअर केला आहे.
पुण्यातील एका पीठ गिरणी मालकाने आपला छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या १६ परवानग्या फ्रेम करून ठेवल्या आहेत. गिरणीच्या जवळच कुठेतरी राहणाऱ्या चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट (CFA) नितीन एस धर्मावतने (Niteen S Dharmawat) ही गोष्ट पहिली आणि याचा फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये काढून घेतला. पीठ गिरणीच्या मालकाने भिंतीवर १६ कागदपत्रे फ्रेम करून लावलेली दिसत आहेत. प्रत्येक कागदपत्रावर परवाना, मंजुरी किंवा कायदेशीररित्या दुकान चालवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र आणि त्यांच्या शेजारी भारतीय संविधानाची फ्रेम केलेली प्रत सुद्धा आहे.
पोस्ट नक्की बघा…
१६ वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या (Viral Photo )
१६ कागदपत्रे पाहून नितीन एस धर्मावतने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, ‘भारतात व्यवसाय करण्याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे? माझ्या शेजारी एक छोटी पीठ गिरणी आहे. इथला मालक एक कष्टाळू माणूस आहे. त्याला त्याचे दुकान सुरू करण्यासाठी १६ वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या. दुकान मालकाने सर्व नियमांचे पालन केले पण तरीही काम सुरू करण्यापूर्वी त्यांना अनेक अडचणींमधून जावे लागले. एक साधी पीठ गिरणी चालवण्यास त्याला बराच वेळ लागला. त्याने ती सर्व परवानगी कागदपत्रे फ्रेम केली आहेत आणि ती त्याच्या दुकानात भिंतीवर टांगली आहेत. त्यांच्या शेजारीच, त्याने भारतीय संविधानाची प्रत देखील फ्रेम केली आहे ; अशी कॅप्शन लिहिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @niteen_india या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून थक्क झाले आहेत आणि फक्त पीठ गिरणी चालू करण्यासाठी १६ परवानग्या घ्याव्या लागल्या ही गोष्ट पाहून वेगेवगेळ्या पद्धतीने आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ही पोस्ट व्हायरल होताच नितीन या युजरला ‘वाणिज्य मंत्रालयासह सरकारी अधिकाऱ्यांकडून अनेक फोन आले आहेत. तसेच समस्या समजून घेण्यासाठी आणि सुधारणात्मक उपाययोजना करण्यासाठी टीमने सकारात्मक विचारसरणी मांडली आहे. तसेच ते गिरणीच्या मालकाशीही बोलले आहेत ; अशी पुढील अपडेट सुद्धा दिली आहे.