Viral Post : कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे, कारण प्रत्येक कंपनीला कर्मचाऱ्यांकडून चांगल्यातले चांगले काम करून हवे आहे. अशावेळी कर्मचाऱ्याला एकावर एक जबाबदाऱ्या दिल्या जातात. पण, कामासाठी जीव तोडून मेहनत घेतल्यानंतर एक वेळ अशी येते की, वाटते महिनाभर सुट्टी घेऊन नुसता आराम करावा, पण असे अनेकदा शक्य होत नाही; कारण कंपनीच्या कामाचे टार्गेट असते. पण, या टार्गेटच्या नादात कर्मचाऱ्यांची फार वाईट अवस्था होऊन जाते. दरम्यान, सोशल मीडियावर एका भारतीय वंशाच्या सीईओने त्यांच्या कंपनीच्या वर्क कल्चरबाबत एक पोस्ट केली आहे, त्याची आता सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अनेकांनी ती पोस्ट वाचून संताप व्यक्त केला आहे, तर काहींनी चक्क या सीईओला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा दावा केला आहे.
कंपनीत वर्क लाइफ बॅलेन्सला जागा नाही
k
k
Graptile या एआय स्टार्टअपचे सीईओ दक्ष गुप्ता यांनी त्यांच्या कंपनीतील वर्क कल्चरबाबत ही पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीत ८४ तासांचा वर्क वीक आहे. वर्क लाइफ बॅलेन्सला इथे जागा नाही. गुप्ता यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, त्यांच्या कंपनीत सकाळी ९ वाजल्यापासून काम सुरू होते आणि रात्री ११ वाजेपर्यंत काम असते. कंपनीतील वातावरण अतिशय तणावपूर्व असते, जेथे कर्मचारी केवळ कामावर लक्ष केंद्रित करतात. शनिवारी सुट्टी नसते, काही वेळा रविवारीही काम करावे लागते.
गुप्ता यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही मुलाखतीच्या पहिल्याच टप्प्यात उमेदवारांना स्पष्टपणे सांगतो की, आमच्या कंपनीत वर्क लाईफ बॅलेन्सला वाव नाही, पूर्वी हे सांगणे विचित्र वाटायचे, पण आता अशी पारदर्शकता असणे योग्य वाटते.
“मला आता जीवे मारण्याच्या धमक्या येतात”’
दक्ष गुप्ता यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली, ज्याला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. दरम्यान, या पोस्टवरून बरेच वाददेखील रंगले, काहींनी त्यांच्या कंपनीतील पारदर्शक कारभाराचे कौतुक केले, तर काहींनी हे टॉक्सिक वर्क कल्चर असल्याचे म्हटले आहे. या सर्व टीकेनंतर दक्ष गुप्ता यांनी आणखी एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी दावा केला की, आता त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांनी म्हटले की, माझ्या इनबॉक्समध्ये २० टक्के जीवे मारण्याच्या धमक्या आणि ८० टक्के नोकरीचे अर्ज येत आहेत.

अलीकडेच इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कामाच्या तासांबाबत एक विधान केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी दिवसाचे १४ तास आणि आठवड्यातून ८० तासांपेक्षा जास्त काम केले पाहिजे असे म्हटले होते, यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.