वंदे भारत ट्रेनचे आकर्षण अनेक प्रवाशांना आहे. या ट्रेनमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ट्रेनमधून प्रवाशांना प्रवास करणे सोईस्कर जाते. पण, काही प्रवासी या सोई-सुविधांचा अगदीच गैरफायदा घेतात आणि रेल्वेच्या वस्तूंचे नुकसानही करतात. सोशल मीडियावर वंदे भारत ट्रेनची एक पोस्ट व्हायरल होत आहे. एक कुटुंब वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करताना नाश्ता करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टेबलवर त्यांच्या मुलांना बसवताना दिसले.
वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक सुविधा आहेत. प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र चार्जिंगची सोय, जेवण किंवा नाश्त्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल, रोटेट चेअर, तसेच कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर गाठणे अशा अनेक सुविधांमुळे वंदे भारत ट्रेन प्रवाशांना आकर्षित करते. रेल्वे अधिकाऱ्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे; त्यात एक कुटुंब वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करताना दिसते आहे.
पोस्ट नक्की बघा :
तसेच या पालकांनी ट्रेनमध्ये नाश्ता करण्यासाठी बनवण्यात आलेल्या फोल्डेबल टेबलवर त्यांच्या दोन लहान मुलांना बसवले आहे आणि ते नाश्ता करताना दिसत आहेत. हे पाहून रेल्वे अधिकाऱ्यांनी ही पोस्ट शेअर करीत कॅप्शन लिहिलीय की, वंदे भारत आणि इतर गाड्यांमधील स्नॅक्स ट्रे तुटणे किंवा नाष्ट्याचे ट्रे खराब होण्याचे हे एक प्रमुख कारण आणि तेही फोटोच्या पुराव्यासह! आता काही जण म्हणतील की, मी फक्त प्रवाशांना दोष देतो. #भारतीय रेल्वे #जबाबदारी #प्रवासी अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट रेल्वे अधिकारी अनंत रूपनगुडी यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @अनंत_IARS या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच त्यांनी या पोस्टला कॅप्शन देत आपले मत मांडले आहे. अनंत रूपनगुडी हे १९९७ च्या बॅचचे IRAS अधिकारी आहेत. ट्रेन, बस यांच्यामधून प्रवास करताना तेथील परिसर स्वच्छ ठेवणे आणि त्यांचा योग्य तो वापर करणे हीसुद्धा आपली जबाबदारी असते आणिया गोष्टीची जाणीव करून देत रेल्वे अधिकारी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.