सोशल मीडियाच्या येण्यानं अचंबित आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या अनेक पोस्ट पाहायला मिळतात. अशीच एक पोस्ट हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. ‘वधू सासरी जाताना कसे रडावे, शिका फक्त सात दिवसांत’, असा संदेश असलेला एक फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर होतो आहे. वृत्तपत्राच्या कात्रण स्वरुपातील हिंदी भाषेतील ही पोस्ट अनेकजण शेअर करत असून, याविषयीच्या चर्चेलादेखील सोशल मीडियावर उधाण आले आहे.
वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण असलेल्या या पोस्टनुसार, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये वधूंना रडण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. जेणेकरून लग्नातील उपस्थितांना रडण्याचा अभिनय वाटू नये आणि व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये वधू आणि इतर स्त्रियांचं रडणं नैसर्गिक वाटावं. भोपाळमधील राधिका राणी नावाच्या महिलेने वधूंसाठी हा क्रॅश कोर्स सुरू केला. सात दिवसाच्या या कोर्समध्ये वधूला रडण्याची कला शिकवली जाते. एका लग्नप्रसंगी सासरी निघालेल्या वधूला निरोप देतांना उपस्थित महिलांना रडूच कोसळत नसल्यानं त्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालं, त्याक्षणी राधिकाच्या मनात या कोर्सची कल्पना आली. राधिकाच्या मैत्रिणीच्या लग्नात जमलेल्या स्त्रियांना रडायलाचं येत नसल्यानं, रडण्यास कशी सुरुवात करावी हेच त्यांना कळत नव्हतं. प्रथम तू रडायला सुरूवात कर, अशी खूसपूस त्यांच्यात सुरू झाली. कसेबसे करून एका मैत्रिणीने रडण्यास सुरुवात केली, परंतु तिची ‘ओव्हर अॅक्टिंग’ पाहून वधू रडण्याऐवजी हसायलाच लागली. हा हस्यास्पद प्रसंग पाहून उपस्थितांनादेखील हसू अनावर झाले आणि सर्व वातावरण हास्यमय झालं.
सासरी निघालेल्या वधूला निरोप देताना रडू कोसळणं हल्ली कठीण जात असल्याचं राधिकाचं मानण आहे. लग्नासाठी पैसा खर्च केला जाऊ शकतो… परंतु, घरातल्याच मंडळींना रडाव लागतं. याकारणानेच आपण हा कोर्स सुरू केला… जो वधूला आणि इतर स्त्रियांना निरोपाच्या वेळी कसं रडावं, याची शिकवण देईल, असे त्या सांगतात.
ही पोस्ट अनेकजण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हे पेपर कात्रण खरचं एखाद्या वृत्तपत्राचं आहे अथवा कोणीतरी फोटोशॉपचा वापर करून तयार केलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काहीही असलं तरी या पोस्टने लोकांना नक्कीच अचंबित केलं आहे.