Viral Poster Shows Heart-Warming Msg : आपल्या जोडीदाराकडे एखादी बाईक किंवा महागडी कार असावी, अशी काही मुलींची इच्छा असते. मग तो तिचा प्रियकर असो किंवा नवरा. पण, काही मुली अशा असतात की, त्या फक्त आपल्या जोडीदाराचा स्वभाव प्रेमळ, समजून घेणारा आहे का फक्त हेच बघतात आणि त्याच्याबरोबर चालत किंवा रिक्षातून प्रवास करणेसुद्धा सुख मानतात. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे. त्यामध्ये रिक्षाचालकाने तरुण मंडळींसाठी एक खास पोस्टर (Poster) रिक्षात बसवून घेतले आहे.
एक प्रवासी रिक्षा थांबवतो आणि त्यात बसतो. व्हायरल फोटोनुसार रिक्षाचालकाने अगदी लग्नमंडपासारखी रिक्षा सजवलेली दिसते आहे. सुरुवातीला झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रिक्षाकडे प्रवाशाचे लक्ष जाते. रिक्षाचालकाने लाल रंगाचा फेटासुद्धा डोक्यावर लावलेला दिसतो आहे. फक्त एवढेच नाही, तर ड्रायव्हरच्या सीटच्या मागे एक लाल अक्षरांत एक सुंदर मजकूर लिहिलेला असतो. नक्की काय लिहिले आहे रिक्षाचालकाने व्हायरल पोस्टरमधून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
पोस्ट नक्की बघा…
तुम्ही व्हायरल पोस्टमध्ये पाहिले असेल की, ‘ज्याला रिक्षाचा प्रवाससुद्धा मर्सिडीजसारखा वाटेल अशा व्यक्तीबरोबर राहा’, असा मजकूर लाल रंगात लिहिला आहे. आजकाल अनेक मंडळी कोणाकडे पैसा आहे, गाडी आहे हे पाहून त्यांच्या जोडीदाराची निवड करतात. पण, तो प्रत्येक सुख-दुःखात तुमची साथ देईलच का हेसुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे नाही का? त्यामुळे आजकालच्या तरुण मंडळींची होणारी मनाची घालमेल पाहता, जोडीदार कसा असावा हे अगदी कमी शब्दांत सांगत रिक्षाचालकाने खास संदेश दिला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
तेव्हा ऑटो राईड सुद्धा तुम्हाला एखाद्या मर्सिडीज प्रवासासारखी वाटते…
सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट @duaxaestxhetic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. काही नेटकरी ही पोस्ट पाहून, सहमती दर्शविताना दिसत आहेत; तर अनेक जण ‘आम्हाला तर मर्सिडीज पाहिजे’, असे म्हणताना दिसत आहेत. तसेच एका युजरने, “खरे प्रेम हे लक्झरी गोष्टींमध्ये नसते, तर ते अगदी छोट्या क्षणांमध्ये आनंद मिळवणे असते आणि हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीबरोबर असता, तेव्हा एक ऑटो राईडसुद्धा तुम्हाला एखाद्या मर्सिडीज प्रवासासारखी वाटते” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.