Viral video: भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. सध्या एका रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली जिथे एका कुत्र्याला धावत्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढवताना कुत्रा थेट रेल्वे रुळाखाली गेलाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून सर्वजण संताप व्यक्त करत आहेत.
ही दुर्दैवी घटना बोगी क्रमांक १९३७५१ जवळ घडली, जिथे पाळीव प्राण्यांच्या मालकाने निष्काळजीपणा दाखवत धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना कुत्र्याचा पट्टा धरला आणि कुत्र्याला प्लॅटफॉर्मवर जबरदस्तीने ओढण्यात आले आणि याचदरम्यान तो ट्रेन आणि रुळांमधील अंतरात पडला. काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्स घातलेला माणूस त्याच्या कुत्र्यासह चालत्या ट्रेनजवळ उभा असल्याचे दिसत आहे. पुढच्या काही सेकंदातच, तो दाराच्या हँडलला धरून आणि त्याच्या पाळीव प्राण्याला ओढून ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो. दुर्दैवाने, कुत्र्याला चालत राहण्यासाठी धडपड करावी लागते आणि अखेर तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक अंतरामध्ये अडकतो. ट्रेन पुढे सरकत असताना, तो माणूस त्याच्या पाळीव प्राण्याला शोधत वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत असल्याचे दिसून येते.
ही घटना भयानक असली तरी, मिळालेल्या माहितीनुसार कुत्रा या घटनेतून चमत्कारिकरित्या बचावला. तथापि, या माहितीची अद्याप पुष्टी झालेली नाही. घटनेची नेमकी वेळ आणि ठिकाण देखील अद्याप माहित नाही.
पाहा व्हिडीओ
पाळीव प्राण्यांच्या मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी
व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे प्राणीप्रेमी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी मालकाच्या बेजबाबदार वर्तनाचा निषेध केला आहे आणि त्याला निष्काळजीपणाचे कृत्य म्हटले आहे. एकानं “लायकी नाही तर कशाला सांभाळायचं” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं, “काय चूक होती रे त्या जीवाची” अशी प्रतिक्रिया दिलीय. या घटनेमुळे पाळीव प्राण्यांच्या मालकावर प्राण्यांच्या क्रूरतेशी संबंधित बीएनएस कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे स्थानकांवर जिथे अशा अपघातांचे दुःखद परिणाम होऊ शकतात, त्या ठिकाणी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेबाबत कठोर नियमांची आवश्यकता अधोरेखित केली आहे.