Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे नवनवीन व्हिडीओ सतत समोर येत असतात. ज्यात कधी एखादा वाघ, सिंह, बिबट्या इतर प्राण्यांची शिकार करताना आपण पाहतो तर कधी इतर प्राणी या हिंस्र प्राण्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करताना दिसतात; असे थररारक व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात चक्क एक कुत्रा स्वतःहून वाघाला खुन्नस देताना दिसत आहे.
अनेकदा वाघ आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळाली तरी लोकांचा थरकाप उडतो. वाघाला पाहिल्यावर लोकच काय तर प्राणीदेखील स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळतात. पण, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक जंगली कुत्रा स्वतःहून वाघाला आव्हान देताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ ताडोबा जंगलातील असून हा इन्स्टाग्रामवरील @birdman_sumedh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ताडोबा जंगलातील एका रस्त्याच्या कडेला एक वाघ निवांत बसला आहे, त्यावेळी एक जंगली कुत्रा वाघाला पाहून त्याच्या जरा जवळ जातो आणि त्याला खुन्नस देतो. त्यावेळी वाघ त्याच्याकडे रागाने पाहतो, मग हा कुत्रा वाघाला आणखी खिजवण्यासाठी जोरात उड्या मारतो. त्यावेळी वाघ उठून त्याच्याजवळ येतो, तेव्हा हा पठ्ठ्यादेखील त्याच्याजवळ जातो आणि हळूच पुन्हा मागे येऊन जोरात पळण्याचं नाटक करतो.जंगली कुत्र्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून युजर्सही यावर अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत.
हेही वाचा: कुत्र्याचा केला पोपट! चिकनचे आमीष दाखवून मालकिणीने खाऊ घातली भाजी; VIDEO पाहून पोट धरून हसाल
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर एकाने लिहिलंय की, “वाघ मनातल्या मनात म्हणत असेल, एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागूच देणार नाही.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ”, तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “बहुतेक याला माहीत नाही की, हा वाघ आहे.” तर आणखी एकाने खूप महत्त्वाची माहिती देत लिहिलंय की, “जंगलामध्ये सगळ्यात खतरनाक प्राणी, ज्याची दहशत असते ते म्हणजे हे जंगली कुत्रे. यांना वाघ, सिंहसुद्धा घाबरतात. कारण यांच्या एका टोळीत साधारणपणे ४० ते ६० सदस्य असतात. एवढे मोठे टोळके जंगलात अस्तव्यस्त फिरत असतात आणि ज्यावेळी त्यांना असा खतरा जाणवतो, ते आपल्या बाकीच्या साथीदारांना याप्रकारे आवाज काढून बोलवून घेतात.”
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर आतापर्यंत १५.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर साडे चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.