Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून, सोशल मीडियावर लग्नातील अनेक मजेशीर किस्से, फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यात वधू आणि वर एकमेकांना अनोख्या पद्धतीने हार घालताना दिसत आहेत.
लग्नात हार घालतेवेळी नेहमीच वधू-वराची भावंडं आणि मित्र-मैत्रिणींकडून गोंधळ केला जातो. मागील काही वर्षांपासून वधू लग्नात वराला हार घालतेवेळी वरपक्षातील मंडळी नवऱ्याला उचलून घेतात. त्यानंतर वधूपक्षातील मंडळीदेखील वर तिच्या गळ्यात हार घालताना नवरीला उचलतात. या प्रकारचे मजेशीर चेष्टेचे वातावरण हल्ली अनेक लग्नांत पाहायला मिळते, अनेकदा या गोंधळामुळे लग्न लावणारे गुरुजीदेखील वैतागतात. दरम्यान, असाच एक वरमाला घालतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय; ज्यातील हटके पद्धत पाहून तुम्हीही अवाक व्हाल.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @keshav_khanale09 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्नमंडपात वधू आणि वर एकमेकांना हार घालण्यासाठी उभे आहेत. त्यांच्या मागे वधू आणि वर पक्षातील मंडळीदेखील उभी आहेत. सुरुवातीला जेव्हा वधू वराच्या गळ्यात हार घालणार त्या प्रसंगी वर चक्क स्वतःहून खाली बसला आणि मग वराला हार घालून झाल्यावर, जेव्हा वर वधूला हार घालणार होता त्यावेळी वधूदेखील खाली बसली आणि मग हार घातल्यानंतर पतीच्या पाया पडली. एकमेकांना लग्नात हार घालण्याची ही हटके पद्धत खूप उत्तम आणि शांततेत पार पडली. नाही तर इतर लग्नांमध्ये हार घालताना गोंधळाचे वातावरण असते. सोशल मीडियावर या नव्या पद्धतीचे अनेक जण कौतुक करीत आहेत; तर काही जण खिल्लीदेखील उडवीत आहेत.
हेही वाचा: पप्पांची परी आली जोमात अन् हत्ती गेला कोमात; अपघाताचा थरराक VIDEO पाहून माराल कपाळावर हात
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अशा या व्हिडीओला आतापर्यंत ३.३ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ४६ हजारांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कौतुकही करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “मी काय म्हणतो लग्नात चष्मा घालणं गरजेचं आहे का?” तर, दुसऱ्यानं लिहिलंय की, काही दिवसांनी झोपून हार घालण्याची पद्धत येणार आहे.” आणखी एकानं लिहिलंय, “वरती उचलणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असल्यामुळे ही वेळ आली असावी.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “ही पद्धत आवडली बघ दादा. बायकोला राग आला, तर नवऱ्यानं झुकायचं आणि नवऱ्याला राग आला, तर बायकोनं झुकायचं, याचं एक जिवंत उदाहरण आहे हे”
दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील एक असाच एक हटके व्हिडीओ समोर आला होता; ज्यात एक नवरा लग्नात जाताना चक्क त्याच्या बैलगाडीत बसून जात होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.