विधानसभेचं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीमधील आमदारांमध्ये घोषणाबाजी झाल्याचं चित्र पहायला मिळालं. पहिल्या दिवसाचं कामकाज लवकर आटोपल्यानंतर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे नियोजित शिवसंवाद यात्रेसाठी रायगडला रवाना झाले. पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांविरोधात आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर आदित्य दुपारनंतर कोकणातील अलिबागमध्ये पोहचले. यावेळेस मोठ्या उत्साहात शिवसेनेच्या समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं. मात्र त्यांच्या भाषणादरम्यान घडलेल्या एका प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नक्की वाचा >> ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…
अलिबागमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे हे मंचावर उभे राहून भाषण देत होते. रस्त्यावरच मंच उभारुन ही छोटेखाणी सभा घेण्यात आली होती. आदित्य भाषण देत असतानाच मंचाच्या उजव्याबाजूला रस्त्याच्याकडेला असणाऱ्या स्थानिक भाजापा कार्यलायामधून काहीजण आदित्य यांचे फोटो काढत होते. समोरच्या नागरिकांशी संवाद साधताना आदित्य यांना ही गोष्ट लक्षात आली. त्यांनीही अगदी मनमोकळेपणे बोलता बोलताना फोटो काढणाऱ्या व्यक्तींकडे पाहत हात दाखवून छान स्माइल दिली.
नक्की वाचा >> सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”
आदित्य ठाकरेंनी केलेली ही कृती पाहून सर्वच समर्थकांनी “आदित्य ठाकरेंचा विजय असो”, “उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. हा सारा घटनाक्रम मंचाच्या जवळच उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने कॅमेरात टीपला आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
नक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”
सध्या आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटचा दौरा सुरु आहे. आदित्य यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा चौथा टप्पा येत्या २० ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. ‘शिव संवाद’ यात्रे दरम्यान ते जळगाव इथल्या पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे आणि मालेगाव येथील कार्यकर्त्यांशी साधणार आहेत .