Viral Video: देशात अनेक नागरिक विमानाने प्रवास करतात. थोडा खर्चीक; पण आरामदायक असा हा प्रवास अनेकांना सोईस्कर वाटतो. विमानातून प्रवास करताना सुरक्षेच्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात येते. विमानात चढण्यापूर्वी सामान तपासले जाते. सामान तपासण्यासाठी तिथे सुरक्षा कर्मचारी आणि काही यंत्रेसुद्धा असतात. या यंत्राच्या मदतीने सामान तपासले जाते. आज सोशल मीडियावर असाच एक विमानतळाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सामानाची काळजी घेण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.
विमानातून प्रवास करताना आपण गरजेच्या अनेक वस्तू घेऊन जातो. कपडे, मोबाईल चार्जर, मौल्यवान वस्तू ते अगदी खाण्या-पिण्याच्या गोष्टीदेखील या सामानात असतात. त्यामुळे या सामानाची काळजी घेणेही तितकेच जबाबदारीचे काम असते. तर, व्हायरल व्हिडीओत विमानतळावर कर्मचारी कन्व्हेअर बेल्टवरून येणाऱ्या सामानाची योग्य काळजी घेताना दिसून आले आहेत. सामान तपासून जेव्हा कन्व्हेअर बेल्टवर येते तेव्हा कर्मचारी कशा पद्धतीने सामानाची काळजी घेतात ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओ वाराणसीचा आहे. या यंत्रावरून जेव्हा सामान तपासून कन्व्हेअर बेल्टवर फेकले जाते तेव्हा बॅग्स या यंत्रावर जोरात आपटून सामानाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे विमानतळावर उपस्थित एक कर्मचारी एक स्पंज बोर्ड घेऊन उभा आहे. जेव्हा सामान कन्व्हेअर बेल्टवर येते तेव्हा या स्पंज बोर्डच्या मदतीने सामानाचे कोणतेही नुकसान होत नाही आणि बॅग प्रवाशांपर्यंत सुखरूप पोहोचते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @baxirahul या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला “कन्व्हेअर बेल्टवर सामानाची काळजी घेतली जात आहे हे पाहून छान वाटले”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. पण, नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही जणांना हे फक्त रीलसाठी करण्यात आले आहे, असे वाटत आहे. अनेक जण या कल्पनेचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.