Viral Video: राज्यात काल मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ जागांसाठी मतदान झाले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली, तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान मतदान केंद्रावर रांगा पाहायला मिळतात. मतदान करणाऱ्या लोकांच्या असंख्य व्हिडीओपैकी गुजरातमधील एका व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. काय आहे या व्हिडीओत खास, चला या लेखातून पाहू.
गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क पायाच्या बोटाने मतदान केल्याची माहिती समोर येत आहे. अंकित सोनी या मतदाराने त्याच्या पायाच्या बोटावर जांभळ्या-काळ्या रंगाची शाई लावलेलीसुद्धा दिसते आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेशी बोलताना अंकित सोनी या मतदाराने २० वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने दोन्ही हात कसे गमावले याची हृदयद्रावक घटना शेअर केली आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
आवश्यक कामे करण्यासाठी २० वर्षांपासून व्यक्ती आपले पाय वापरत आहे. पण, त्यांनी आपल्या अपंगत्वाला शिक्षण घेण्यापासून स्वतःला थांबवले नाही व यशस्वीरित्या एमबीए पदवीदेखील मिळवली. शिक्षण पूर्ण करण्यात त्यांच्या गुरुजींचा वा शिक्षकांचा मोलाचा वाटा होता. तसेच व्हिडीओच्या शेवटी, अंकित सोनी यांनी स्वतःचे कर्तव्य बजावण्याचे व इतर नागरिकांना घराच्या बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ANI यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “अंकित सोनी या मतदाराने मतदान केंद्रावर पायाच्या बोटांच्या सहाय्याने मतदान केले आहे”, अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काही जण व्यक्तीचे कौतुक करत आहेत तर बरेच जण “इतरांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तो ECI चा राजदूत असावा”; आदी अनेक कमेंट करताना नेटकरी दिसून येत आहेत. याअगोदरदेखील आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व मतदारांच्या मतदान जागरुकतेला चालना देण्यासाठी चेन्नईतील स्कूबा डायव्हर्सच्या एका ग्रुपने ‘अंडर वॉटर वोटिंग अव्हेरनेस’ हा अनोखा उपक्रम राबवला होता. तर आज या व्यक्तीने पायाने मतदान करून एक उत्तम उदाहरण जगापुढे ठेवलं आहे.