रस्त्यावर होणारे अपघात हे कोणत्याही देशात नवीन नाहीत. दुचाकीस्वार अनेकदा घाई करत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत असल्याच्या घटना घडतात. अशाप्रकारचे अपघात अनेकदा जीवावर बेतणारेही असतात. मात्र तुमच्या डोक्यावर हेल्मेट असेल तर तुमचा जीव यातून सुखरुप वाचू शकतो. पुण्यात सध्या हेल्मेट सक्तीला होत असलेच्या पार्श्वभूमीवर एका पोलिस अधिकाऱ्याने एक व्हिडियो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. राज तिलक रोशन असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे. पाहा हेल्मेटने या व्यक्तीला कशी मदत केली असेही त्यांनी या पोस्टखाली लिहीले आहे. या अपघाताचा श्वास रोखून धरायला लावेल असा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Watch how Helmet helped him#roadsafety pic.twitter.com/cL1tpYK6XZ
— Raj Tilak Roushan, IPS (@rtr_ips) January 10, 2019
एक दुचाकीस्वार ट्रकच्या अतिशय जवळून जात असल्याचे दिसत आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याचा तोल जातो आणि तो पडतो. याचवेळी ट्रकचे चाक पूर्णपणे त्याच्या डोक्यावरुन जाते. इतके मोठे चाक डोक्यावरुन जाऊनही त्याचा जीव वाचतो आणि विशेष म्हणजे त्याला साधे खरचटतही नाही. याचे कारण म्हणजे त्याच्या डोक्यावर हेल्मेट असते. त्याच्या हेल्मेटचा चक्काचूर होतो पण त्याला अजिबात इजा होत नाही. ही घटना घडल्यानंतर तो रोडच्या बाजूला असलेल्या फूटपाथवर बसतो. त्यामुळे तुम्ही जर हेल्मेट वापरत नसाल किंवा हेल्मेट सक्तीला विरोध करत असाल तर हा व्हिडियो तुम्ही नक्की पाहायला हवा.