Viral video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक भावूक करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कुणी गरीबांची मदत करताना दिसतं, तर कधी रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना आनंद देताना दिसतं.अनेकदा आपण धडधाकट असतानाही अनेक तक्रारी करीत असतो. पण, आपल्या आजूबाजूला असेही काही लोक आहेत की, त्यांच्याकडे जे आपल्याकडे आहे तेसुद्धा नाहीये. त्यामध्ये दिव्यांगही येतात. हीदेखील माणसं असली तरी त्यांना अनेकदा समाज वेगळी वागणूक देताना दिसतो. मात्र, दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांना योग्य तो सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही बाब प्रशासनाकडूनही कित्येकदा लक्षात घेतली जात नाही. दिव्यांग व्यक्तींना समान संधी देण्याबाबत अनेकदा बोललं जातं; मात्र त्यांच्या सुविधांबाबत आजही विचार केला जात नाही. त्यामुले दिव्यांगांना बाहेर वावरताना प्रचंड त्रास सहन करीत आपला टप्पा पार करावा लागतो. असाच एक मन सुन्न करणारा आणि विचार करायला भाग पाडणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
केवळ व्यवस्थाच नाही तर तुम्ही आम्ही सगळेच हरलो
या घटनेनंतर केवळ व्यवस्थाच नाही, तर तुम्ही-आम्ही सगळेच हरलो आहोत. अपंग व्यक्तींना आरक्षण आणि बसभाड्यात सवलत मिळते; पण ती पुरेशी नाही. दिव्यांग लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यासाठी केवळ योग्य पायाभूत सुविधांचीच गरज नाही, तर चांगल्या प्रवेशयोग्यतेचीही गरज आहे. आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची आणि ती सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी सर्वसमावेशक बनविण्याची गरज आहे. या व्हिडीओमध्ये एसटीमध्ये चढताना या अपंग बांधवाची होणारी धडपड पाहून तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येईल.
दिव्यांगाची अवस्था पाहून मन सुन्न होईल
या व्हिडीओमध्ये तम्ही पाहू शकता की, एक दिव्यांग व्यक्ती बसस्थानकामध्ये बसच्या दिशेने जात आहे. चिखलातून, पाण्यातून कशीबशी वाट काढत रांगत जाऊन तो बसमध्ये चढतो; परंतु त्याची ती अवस्था बघून मात्र मन सुन्न होतेय. आपल्याला पायांत चप्पल असूनही आपल्याला चिखलातून चालायला आवडत नाही. हा मुलगा तर अक्षरश: या चिखलातून गुडघ्यावर चालत आहे. अशा रीतीने चालताना त्याच्या गुडघ्याला किती लागत असेल आणि त्याला काय वेदना होत असतील हा विचार तरी आपल्या मनात येत असेल का? बसस्थानकातील दुरवस्थेवर नेटकरी प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त करीत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले असून, वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. एकाने कमेंट केली आहे, “संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी बसस्थानकांची हीच अवस्था आहे. दैवानं तर छळलं; पण व्यवस्थेनंही सोडलं नाही. खरंच झालाय का हो आपला देश स्वतंत्र?” आणखी एकाने कमेंट केली आहे, “हा व्हिडीओ काढणाऱ्याचं काळीज दगडाचं आहे. कारण- व्हिडीओ काढण्यापेक्षा त्याला मदत केली असती तर… खूप मोठं पुण्य मिळालं असतं भावा…”
© IE Online Media Services (P) Ltd