ट्रॅफिक पोलिसांचं काम अत्यंत धोक्याचं असतं. एवढया वाहनांच्या मध्ये उभं राहत त्यांचं नियमन करायचं म्हणजे काही खायचं काम नाही.  एखाद्या गाडीने जर अचानक चुकीचं वळण घेतलं तर त्या पोलिसालाही इजा होऊ शकते. त्यात तो धुराच त्रास, सतत वाजणाऱ्या हाॅर्न्सचा गोंगाट आणि ड़ोक्यावर तळपणारा सूर्य किंवा पडणारा पाऊस. त्याहीपुढे जात लायसन्स न घेता ट्रिपल सीट जाणारे किंवा पुण्यात असू तर त्या रस्त्याच्या नावाच्या महात्म्याचे चिरंजीव असल्याच्या थाटात गाडी रेटणारे बरेच सापडतात. पण काही झालं तरी ट्रॅफिक पोलिस मात्र आपलं काम करत शांतपणे उभा असतो.

शहरात रस्त्यावर अनेक अपघात होतात. त्यावेळीही तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका फार मोलाची ठरते. शहरातल्या ट्रॅफिक जॅममधून मार्ग काढत पेशंटना हाॅस्पिटलमध्ये पोचवणाऱ्या अँब्युलन्सना  मार्ग काढून देणारे ते ट्रॅफिक पोलीसच.

ट्रॅफिक पोलिसांच्या रस्त्यावरच्या या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या भूमिकेला अधोरेखित करणारा एक व्हिडिओ सध्या नेटवर व्हायरल होतोय.

चीनमधल्या गिझू शहरातला हा व्हिडिओ आहे. या शहरामधल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ आपल्याला दिसते. वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या या गर्दीत अचानक एक छोटासा मुलगा धावत सुटतो.  लहान असल्याने त्याला अर्थातच आजूबाजूच्या ट्रॅफिकबद्दल काहीच भान नसतं. त्य़ाच्या दिशेने येणारी एक कार भणाणत येते आणि या लहानग्याचा जीव धोक्यात सापडतो.

अशा वेळी तिथला ट्रॅफिक पोलीस या छोट्या जिवाचे प्राण कसे वाचवतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओच पाहायला हवा

 

देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात खरं. पण शहरातल्या या भयाण रहदारीमध्ये या लहानग्यासाठी हा पोलिसच देव बनून आला