Viral video: सोशल मीडियावर हटके पद्धतीने नवनवीन खाद्य पदार्थ बनवणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी कोणी टोमॅटो आइस्क्रीम, तर कोणी व्हॅनिला पाणी पुरी बनवतं. असे एकापेक्षा एक हटके पदार्थ कसे बनवतात हे पाहण्यासाठीदेखील अनेक जण गर्दी करतात; शिवाय काही हौशी खवय्ये हे पदार्थ खाण्याचाही आस्वाद घेतात. दरम्यान, आता असाच एक हटके पदार्थ बनवणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने चक्क चॉकलेटपासून फ्लेमिंगो पक्षी बनवला आहे.

सोशल मीडियावर सतत चॉकलेट्सपासून विविध गोष्टी तयार करणारा लोकप्रिय शेफ अमौरी गुइचॉन नेहमीच त्याच्या या कलेमुळे चर्चेत असतो. शेफ अमौरी गुइचॉनने आत्तापर्यंत बऱ्याचदा चॉकलेटच्या मदतीने वाघ, जिराफ, माकड, कासव तसेच अनेक इतर पक्षी बनवले आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ यापूर्वीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : तुम्ही २.८८ सेकंदामध्ये किती अक्षरं लिहू शकता? या भारतीयाने उलटं लिहून केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा VIDEO

पाहा व्हिडीओ :

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शेफ फ्लेमिंगो पक्षी बनवण्यासाठी सुरुवातीला चॉकलेटच्या काही रिंग्स घेतो आणि त्यांना एकत्र करून त्याचा गोल तयार करतो; त्यानंतर हळू हळू तो फ्लेमिंगो पक्ष्याच्या अवयवांप्रमाणे चॉकलेटचे विविध भाग तयार करून जोडतो. शेवटी तो फ्लेमिंगो पक्ष्याप्रमाणे चॉकलेटला रंग देतो. शेफने तयार केलेला चॉकलेटचा फ्लेमिंगो पक्षी अगदी हूबेहूब दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @amauryguichon या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २.२ मिलियनपेक्षा अधिक लाईक्स, तर ४७.६ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय अनेक युजरदेखील हा व्हिडीओ पाहून शेफचं कौतुक करताना दिसत आहेत.