Cop Slapped Youth For Crossing Road Wathching Mobile : तामिनाडूतील कोइम्बतूरमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या एका पोलिसाने मोबाइल पाहत निष्काळजीपणे रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना कोइम्बतूरमध्ये नल्लमपलयम-संगनूर रस्त्यावर घडली असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या व्हिडिओमध्ये, कवुंडमपलयम पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल जयप्रकाश हे निष्काळजीपणे रस्ता ओलांडत असलेल्या मोहनराज या तरुणाच्या कानशिलात लगावताना दिसत आहेत. नल्लमपलयममधील एका खाजगी कंपनीत नोकरी करणारा मोहनराज या अनपेक्षित हल्ल्यानंतर वेदनेने विव्हळत रस्त्यावरच बसल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तरुणाच्या कानाखाली मारणाऱ्या पोलिसावर जोरदार टीका होत असून, याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेत पोलिसाने, पोलिसांच्या अतिरेकी बळाचा वापर केल्याचे काहींनी म्हटले आहे. तर, काहीजण म्हणाले की, निष्काळजीपणे रस्ता रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला दुसऱ्या पद्धतीनेही समजावू शकला असता. यामध्ये विशेष असे की, तरुणाना कानाखाली मारणारा पोलीस स्व:ता हेल्मेटशिवाय गाडी चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडिओमध्ये, पीडित तरुण त्याच्या फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडताना दिसत आहे. तो रस्ता ओलांडताना दुचाकीवरील पोलिसाने गाडीचा वेग कमी केला आणि तरुणाच्या गालावर एक जोरदार कानशिलात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पीडित तरुण वेदनेने विव्हळत भर रस्त्यात खालीच बसल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित तरुण मोहनराज कोइम्बतूरच्या चिन्ना वेदपट्टी भागातील आहे आणि तो एका खाजगी कंपनीत मजूर म्हणून काम करतो. जयप्रकाश त्याच्या कंपनीसाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी नल्लमपलयम परिसरातील एका दुकानात जात असताना ही घटना घडली.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची दखल घेतली आणि जयप्रकाश यांना चौकशीसाठी शहर पोलिस नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.