सोशल मीडियावर कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. श्वानप्रेमींकडून अशा व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. कुत्रा हा माणसांसोबत राहणारा सर्वात निष्ठावान आणि तितकाच हुशार प्राणी आहे. त्यामुळे कुत्र्यासोबत संवाद साधताना अनेक श्वानप्रेमी दिसतात. कुत्र्याला ट्रेनिंग देऊन उठण्याबसण्यापासून कमांड दिल्या जातात. कुत्राही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो. असाच एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कुत्रा मालकाला कार पार्किंगसाठी मदत करताना दिसत आहे. गाडी पार्क करताना कुत्रा गाडीच्या मागे उभा आहे. तसंच गाडी मागे धडकू नये यासाठी मालकाला इशारा देताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, कुत्रा गाडी पार्किंगमध्ये मागच्या दोन पायावर बसला आहे आणि पुढच्या दोन पायाने गाडी मागे घेण्याचा इशारा देत आहे. त्यानंतर मालक गाडी पार्किंगच्या जागेत लावण्यासाठी रिव्हर्स घेत आहे. तसेच गाडी मागील फुटपाथच्या भिंतीला धडकू नये म्हणून कुत्रा भुंकून कार चालकाला सिग्नल देतो. मालक लगेचच कुत्र्याचा सिग्नल मिळाल्यानंतर गाडी थांबवतो. goldenretrieversdelights या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील कुत्र्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. विशेषत: श्वानप्रेमी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.