अमृतसर-कटिहार एक्सप्रेसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक टीटीई आणि कोच अटेंडट मद्यधुंद व्यक्तीला मारत आहे. दरम्यान मद्यधुंद व्यक्तीने तरुणीची छेड काढल्याने त्याला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. बुधवारी ही घटना घडली.
कोच अटेंडंटने केले प्रवाशाबरोबर मद्यपान
ट्रक चालक शेख ताजुद्दीन बिहारमधील सिवानहून नवी दिल्लीला प्रवास करत होता. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, एम२ कोचमध्ये त्याने विक्रम चौहान आणि सोनू महातो या दोन कोच अटेंडंट्सबरोबर मद्यपान केले होते. दारूच्या नशेत त्याने महिला प्रवाशांशी गैरवर्तन केले, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ताजुद्दीनने चौहान याने प्रवासी तिकीट परीक्षक (टीटीई) राजेश कुमार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला तेव्हा परिस्थिती आणखीच बिघडली.
महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या मद्यधुंद प्रवाशाला टीटीई आणि कोच अटेंडंटने दिला चोप
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये टीटीई आणि कोच अटेंडंट प्रवाशाला लाथा मारताना दिसत आहे आणि त्याला शिवीगाळ करताना दिसत आहेत.
दुसऱ्या व्हिडिओमध्ये, टीटीई प्रवाशाला जमिनीवर ढकलताना दिसत आहे तर अटेंडंट चौहानने दरावजाजवळ पट्ट्याने त्याला मारहाण करत आहे.
सहप्रवाशांनी केला धक्कादायक खुलासा
सहप्रवासी धीरज यादव यांनी पोलिसांना सांगितले की,”कोच अटेंडंटने प्रवाशाकडून पैसे घेतले आणि त्यांच्या दारू पार्टीत सामील झाला. “कोच अटेंडंटने प्रवाशाकडून पैसे घेतले आणि सीटवर बसून मद्यपान केले. मद्यपान केल्यानंतर त्याा प्रवाशाने गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि अटेंडंटने टीटीईला फोन केला. या दरम्यान प्रवाशाने टीटीईला चापट मारली,” असेही श्री यादव म्हणाले.
पोलिसांनी केली कारवाई
सूचना मिळताच, रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे मद्यधुंद प्रवाशाला खाली उतरवले आणि टीटीईला ताब्यात घेतले. तोपर्यंत कोच अटेंडंट चौहान पळून गेला होता आणि तो ट्रेनमध्ये सापडला नव्हता.
प्रवाशाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही कोच अटेंडंट आणि तिकीट परीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिस्तभंगाची कारवाई करत रेल्वेने टीटीई राजेश कुमार यांना निलंबित केले आहे आणि त्यांना लखनऊ येथील विभागीय मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
सूत्रांनी सांगितले की, “दोन्ही परिचारिकांनाही निलंबित करण्यात आले आहे. काही प्रवाशांनी मद्यधुंद व्यक्तीविरूद्ध तक्रारीही दाखल केल्या आहेत.
या प्रकरणाची दखल घेत, रेल्वेने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. घटनेची माहिती गोळा करण्यासाठी डब्यात असलेल्या प्रवाशांचे मोबाईल नंबर मिळवले जात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.