आपल्याकडे कधी काय व्हायरल होईल आणि त्याला नेटीझन्सकडून कशी पसंती मिळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फेसबुक, व्हॉटसअॅप आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटसवरुन भन्नाट फोटो आणि व्हिडिओ भलतेच गाजतात. नुकताच असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून त्याला चांगलीच पसंतीही मिळत आहे.
‘सैराट’ चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्याने चित्रपटाच्या प्रदर्शनापासून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच थिरकायला लावले होते. या गाण्याची जादू अद्यापही ओसरली नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात एका आजींनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. तरुणांकडून आजींचे कौतुक तर झालेच पण त्यांनी केलेल्या केलेल्या या डान्सला प्रेक्षकांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळाला. गाण्याच्या ठेक्यावर अतिशय नेमकेपणाने डान्स करणाऱ्या आजींनी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांकडून वन्स मोअरही मिळवला.
फेसबुकवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ‘vk पाटील समर्थक only डॉच’ या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या आजींचा डान्स आर्चीहून जास्त भारी वाटल्यास नक्की शेअर करा, व्ह्यूजचा पाऊस पडला पाहिजे असेही व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनी म्हटले आहे. साधारण ७० हून अधिक वर्षांच्या या आजींनी स्टेजवर येताच तरुणांनी एकच गलका केला. गाणे सुरु झाल्यावर त्यांच्या प्रत्येक स्टेपला टाळ्या आणि शिट्यांनी प्रतिसाद देत तरुणांनी त्यांना अतिशय रॉकींग रिस्पॉन्स दिला. त्यांचा झिंगाट डान्स पूर्ण झाल्यावर तर अँकरने त्यांना साष्टांग दंडवतच घातला.
या व्हिडिओला आतापर्यंत ५१ हजार लाईक्स आणि ३८ हजार शेअर्स मिळाले आहेत. याशिवाय १ लाख ८० हजार जणांनी यावर कमेंटस दिल्या आहेत. आजी तुमच्या या उत्साहाचे कौतुक वाटते, आजींची त्या आर्चीशी तुलना कशाला यांसारख्या कमेंटस अनेकांनी या व्हिडिओवर दिल्या आहेत.