देशात करोनाच्या लाटेच्या प्रभाव कमी झालेला नाही. करोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. पण, धोका अजूनही कायम आहे. राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. असे असूनही, लोकांनी मास्क लावणे, एकमेकांपासून योग्य अंतरावर राहणे आणि वेळोवेळी हात धुणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र अनेक जण अद्यापही या गोष्टींकडे सर्सास दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

लॉकडाउन संपताच काही लोकांनी मास्क वापरणं सोडून दिल्याचं पाहायला मिळत आहे. घरांमधून लोक बाहेर पडताना विनामास्क असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर अशाच काही लोकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने रस्त्यावर बाहेर फिरताना मास्क घातलेला नाही. त्यावेळी महिला हवालदाराने त्याच्यासोबत जे केलं त्यावरुन कोणालाही हसू आवरणार नाही.

मास्क घाला देवा मास्क म्हणत केली आरती

व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ आयपीयस अधिकारी भीषम सिंह यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस विनामास्क उभा आहे आणि महिला कॉन्स्टेबल एक पूजेचे ताट घेऊन त्याची आरती करत आहे. महिला कॉन्स्टेबलने त्याची आरती ओवाळल्यानंतर त्याच्यावर फुलं आणि अक्षताही टाकल्या. व्हिडिओमध्ये मागे एक महिला अधिकारी गाणं म्हणत असल्याचे ऐकायला येत आहे. त्या व्यक्तीची आरती ओवाळल्यानंतर महिला कॉन्स्टेबल दुसऱ्या व्यक्तीकडे वळते.

हा व्हिडिओ काढणारी महिला मास्क लावा प्रभू, आपले नाही तर दुसऱ्यांचे तरी प्राण वाचवा अशी आरती म्हणताना दिसत आहे. त्यामुळे समोर उभी असलेली व्यक्तीने लाजेमुळे मान घातली.

हा व्हिडिओ आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रियादेखील देत आहेत. अनेक युजर्सनी कारवाई करण्यासाठी हा योग्य पर्याय असल्याचे म्हटले आहे. तर आणखी एका युजरने बाहेर पडताना मास्क घाला नाहीतर असा अपमान केला जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे मास्क घालणे जरुरी आहे.