कुत्रा हा पाळीव प्राणी माणसाचा मित्र आहे असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आजकाल बऱ्याच घरांमध्ये कुत्रे पाळल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरही कुत्र्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहिल्यावर हसून हसून पोट दुखू लागते. तर काही व्हिडीओ पाहून मन भरुन येते. अशाच एका व्हिडीओची माध्यमांमध्ये चर्चा आहे. फुटबॉलच्या एका सामन्यादरम्यान कुत्र्याने मैदानात प्रवेश केल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.
हा व्हिडीओ चिली या देशातला आहे असे म्हटले जात आहे. दोन विरुद्ध संघांमध्ये सुरु असलेल्या फुटबॉलचा सामना सुरु असताना एक मोठा कुत्रा मैदानात धावत सुटतो. पुढे तो कुत्रा सामन्यामध्ये वापरत आलेला फुटबॉल दातांनी पकडण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे प्रयत्न सुरु असताना फुटबॉलचा सामना थांबतो. दोन्ही संघातील २-३ खेळाडू आणि मॅचमधील रेफरी हे कुत्र्याकडून फुटबॉल परत मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. सुरुवातीला ते सर्वजण कुत्र्याचे लाड करतात. मग त्यातला एक खेळाडू त्या कुत्र्याला उचलून मैदानाच्या बाहेर नेत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. उचलून घेतल्यानंतर त्या बिचाऱ्या कुत्र्याच्या तोंडातून फुटबॉल खाली पडतो आणि तो केविलवाण्या नजरेने बॉलकडे पाहतो. पुढे सुरक्षारक्षक त्या कुत्र्याला खेळाडूकडून घेऊन बाहेर घेऊन जातात.
@Good News Dog या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ १.५ लाखांपेक्षा जास्त ट्विटर यूजर्सनी पाहिला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ लाइक, शेअरदेखील केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळते. त्यातील एका यूजरने ‘प्लीज त्याला फुटबॉल द्या’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘त्याला फक्त फुटबॉलबरोबर खेळायचे आहे’ अशी कमेंट केली आहे. श्वासप्रेमींनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.