Viral Video: बाप-लेकीचं नातं नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत, तो आपल्या लेकीला नेहमीच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो, असं म्हणतात. एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट मुलीसाठी खूप खास आणि लाखमोलाची असते. तसेच मुलींनी बापासाठी केली प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी जगातील सर्वांत सुंदर गोष्ट असते. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
सोशल मीडियावर अनेकदा सोशल मीडियावर माणसातील माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना, तर कधी पालक आणि त्यांच्या मुलांमधील प्रेमाचे क्षण दाखवणाऱ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक बाप आणि त्याच्या मुलींच्या नात्यातील निखळ प्रेम पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचेही डोळे पाणावतील.
परिस्थिती कशीही असली तरीही आई-वडील आपल्या मुलांच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात. मुलांचा वाढदिवस साजरा करून, त्या दिवशी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करणं, हे अनेक आई-वडील करतातच; पण काही मुलंदेखील आपल्या आई-वडिलांसाठी त्यांच्या वाढदिवशी काहीतरी खास करून त्यांना खूश करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातील दोन लहान मुलींनी बाबांच्या वाढदिवशी दोन पदार्थ स्वतः बनवले असून, यावेळी त्या बाबांना खुर्चीवर बसवतात. बाबा खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना स्वतः बनवलेले पदार्थ दाखवतात आणि हॅप्पी बर्थडे, असे म्हणत बाबांना त्यांनी बनवलेला पदार्थ खाऊ घालतात. मुलींचं हे प्रेम पाहून बाबा त्यांना जवळ घेतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही लक्षात येईल की, वाढदिवस साजरा करण्यासाठी केक, डेकोरेशन, गिफ्ट यापेक्षा आहे त्या परिस्थितीत मिळवलेला आनंद आणि नात्यातील प्रेम अधिक महत्त्वाचं असतं.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @hardly2060 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत एक दशलक्षापेक्षा अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “दहा हजारांचा जरी केक आणला तरी या पदार्थासमोर काहीच नाही. या पदार्थामध्ये आपुलकी, संस्कार, समाधान, प्रेम सर्व काही आहे. नशीबवान आहेस तू दादा,” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “ज्या घरात मुलगी जन्माला येते, त्या घरात लक्ष्मीची कृपा असते.” आणखी एकानं लिहिलंय, “वडिलांनीपण छान प्रतिसाद दिला आणि मुलांचं कौतुक करावं तेवढं कमी.”