Viral Video : अपंगत्व हा कोणासाठीही मोठा शाप आहे. अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गोष्टी करतानाही मोठ्या अडचणी येतात. अपंग हे विविध प्रकारचे असते, कोणाला हात नसतात, कोणाला पाय नसतात. असे काही अपंग लोक भीक मागून आपले आयुष्य चालवतात. पण, असे अनेक अपंग लोक आहेत जे कष्ट करून आपले जीवन जगण्याचा निर्णय घेतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अपंग तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ नैराश्यात जगणाऱ्या मंडळींना जगण्याचं सार सांगणारा आहे.
धकाधकीचे आयुष्य, घरच्या जबाबदाऱ्या आणि जास्त पगाराच्या नोकरीच्या प्रयत्नांत अनेक जण नैराश्येच्या गर्तेत अडकताना दिसतात. पण, म्हणतात ना माणसाला त्याचा विचार कमकवूत करतो. जर त्याचे विचार सकारात्मक असतील तर तो अपंगात्वावरदेखील मात करू शकतो, असा मेसेज या व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हाताने अपंग असलेली एक तरुणी गॅस शेगडीच्या जवळ बसून चक्क पायाने भाकऱ्या बनवताना दिसतेय. अगदी गरीब परिस्थितीत ही तरुणी जगतेय. दोन्ही हातांनी अपंग असतानाही ही तरुणी पायाने गोल भाकरी बनवते. इतकेच नाही तर तव्यावर टाकून चांगल्याप्रकारे शेकते. एखाद्या सुगरणीपेक्षा गोलाकार भाकरी या अपंग तरुणीने बनवली आहे. पायाने भाकरी बनवताना तिला खूप मेहनत घ्यावी लागत असतानाही तरुणीच्या चेहऱ्यावर कुठलीही चिंता, काळजी दिसत नाही, ती अगदी आरामात गॅस शेगडीजवळ बसून पायाने भाकऱ्या भाजतेय. तिचा भाकऱ्या बनवण्याचा स्पीड पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. या तरुणीने जिद्दीच्या जोरावर अंपगत्वावर मात करत सामान्य लोकांप्रमाणे आपले जीवन जगत आहे.
हा व्हिडीओ @rahulpatil2089 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या तरुणीचे कौतुक केले आहे. दरम्यान, ही तरुणी कोण आहे? हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Trendng News : गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार! मानवी वस्तीत मगरींचा संचार अन् शिकार; Video पाहून भरेल धडकी, कमेंट्समधून समोर आलं नेमकं ठिकाण
व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट्स
या व्हिडीओवर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, “आलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं हीच शिकवण… दुःखातून मार्ग काढत जगण्याची हीच खरी जिद्द… खरोखर संघर्ष आणि जिद्द याच्या पुढे काही नाही, परिस्थितीपेक्षा मनस्थिती चांगली असावी हे सिद्ध केलं, या ताईवर देवाची कृपादृष्टी राहो…ज्याला दुसऱ्याचे दुःख दिसते, त्याच्याच डोळ्यात पाणी येते..” यावर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, देवा हिला खरंच अन्नाची कमी पडू देऊ नये, तर अनेकांनी देवाने तिला नेहमी सुखी ठेवावे, अशी प्रार्थना केली आहे.